सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश : कोरपना येथे घेतली आढावा बैठकचंद्रपूर : शासकीय अधिका-यांनी प्रत्येक सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहावे आणि नागरिकांची निवेदने स्वीकारावी, त्यावर प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिका-यांना दिले.१० आॅक्टोबर रोजी कोरपना तहसिल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी कोरपना तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. माणिकगड येथील अंगणवाडीचा प्रश्न 20 आॅक्टोबरपर्यंत निकाली काढावा, शासकीय योजनांची माहिती पुस्तिका गावागावांत वितरित करावी, विविध कंपन्यांच्या माध्यमातून गावागावांत आरोग्य शिबीरे घ्यावीत, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम तातडीने हाती घ्यावा, असे निर्देश यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिले. प्रामुख्याने सिंचन, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, आ. संजय धोटे, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, उपविभागीय अधिकारी गोयल, तहसिलदार पुष्पलता कुमरे, पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी कोल्हे, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी कातलाबोडी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी सुलोचना विजय देरकर यांना एक लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आले. या बैठकीला कोरपना तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक सोमवारी शासकीय अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ कार्यालयात हजर राहावे
By admin | Updated: October 12, 2015 01:24 IST