Equestrian after five years | घोडाझरी पाच वर्षांनंतर तुडुंब
घोडाझरी पाच वर्षांनंतर तुडुंब

ठळक मुद्देओव्हरफ्लोची झलक : पर्यटकांची मांदियाळी, नैसर्गिक सौंदर्य डोळे दीपवणारे

घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत.
नागभीड-चंद्रपूर राज्य महामार्गापासून ५ किमी तर नागभीडपासून ९ किमी अंतरावर हे स्थळ आहे. अतिशय मनोवेधक अशा गर्द वनराईने नटलेल्या जंगलातील रस्त्याने या तलावावर जावे लागते. जवळपास पाच किमीचा हा रस्ता आहे. पाच किमीच्या प्रवासात अनेक छोट्या-मोठ्या प्राण्यांचे दर्शन पर्यटकांसाठी पर्वणीच असते. यानंतर दर्शन होते ते विशाल अशा घोडाझरी तलावाचे.
तिन्ही बाजूला असलेल्या नैसर्गिक टेकड्यांमध्ये बांध घालून इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. जेव्हा इंग्रजांनी या तलावाची निर्मिती केली तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन हा मुख्य हेतू होता. परंतु मागील अनेक वर्षांपासून सिंचनासोबतच पर्यटन हा हेतुही मोठ्या प्रमाणावर साध्य होत आहे. पर्यटनासाठी घोडाझरीची भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याने येथे येणारा पर्यटक दिवसभरासाठी या स्थळाच्या मोहात पडतो. घोडाझरीच्या नव्या व्यवस्थापनाने याठिकाणी विविध सोयी पर्यटकांचा उपलब्ध करुन दिला. त्यामुळे त्यांचा आनंद आणखीच द्विगुणीत होत आहे.
घोडाझरीतील या निसर्गसौंदयार्चा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर या ठिकाणी येत असतात. परंतु, घोडाझरीने आपली ओळख पावसाळी पर्यटनासाठीच निर्माण केली आहे. घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला की, ते नितळ नैसर्गिक देखावे, तो विशाल तलाव , तलावाभोवतीच्या त्या हिरव्या गर्द वनराईचे थबथबलेले विहंगम दृश्य डोळ्यांत साठविण्यासाठी आणि त्याचबरोबर सांडव्यावरून पडणाºया फेसाळलेल्या पाण्यात मनसोक्त डूंबण्यासाठी विदर्भातील अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत असतात.
पाच वर्षे दिली हुलकावणी
सन २०१३ मध्ये हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर पूरेशा पावसाअभावी हा तलाव ओव्हरफ्लो झालाच नाही. तब्बल पाच वर्षांनी म्हणजे रविवारी हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. गेली दोन दिवस पावसाने उसंत घेतली. त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होतो की नाही, अशी शंका पर्यटकांमध्ये होती. मात्र डोंगराच्या झरपट्याने घोडाझरी तलाव तुडुंब भरला असून सांडव्यावरून पाणीसुद्धा फेकले जात आहे. दरवर्षी १५ आॅगस्टला या ठिकाणी मोठी गर्दी असते. आता ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांना आनंद घेता येणार आहे.


Web Title: Equestrian after five years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.