लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केल्याच्या घटनेला चार दिवस होण्याअगोदरच ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रियदर्शिनी चौकातील मुख्य पोस्ट ऑफिसजवळून अटक केली. अजय श्याम दुपारे रा. फुले चौक बाबुपेठ चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून ४९ ग्राम ब्राऊन शुगर व मोबाईल असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या कारवाईत आम्ल पदार्थ आढळून येत असल्याने चंद्रपूर जिल्हा ‘’’’उडता पंजाब’’’’च्या वाटेवर तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.चंद्रपुरात जिल्ह्यात दारू बंद करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी नशा करण्यासाठी विविध पदार्थाचा वापर सुरू केला. त्यामुळे जिल्ह्यात आम्ल पदार्थाची तस्करी वाढली. यावर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम सुरू केली. चार दिवसांपूर्वी तेलगणावरून आणलेला गांजा जप्त करण्यात आला.गुरुवारी एक इसम प्रियदर्शिनी चौकातील मुख्य पोस्ट ऑफिसजवळ ब्राऊन शुगरची विक्री करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून प्रियदर्शनी चौकात संशयित व्यक्तीची तपासणी केली यावेळी त्याच्याजवळ ४९ हजार रुपये किंमतीचा ४९ ग्राम ब्राऊनशुगर आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीवर कलम ८ क २१ ब अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
यांनी केली कारवाईही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र बांबोडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गदाने, नितीन जाधव, राजेंद्र खनके नितीन साळवे, मिलिंद चव्हाण, अमीर पठाण, अलूप डांगे, जावेद सिद्दकी आदींनी केली.