भद्रावती: कर्नाटक एम्टा कोळसा खाण प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात कामगारांचे आंदोलन शांततेत सुरु आहे. मात्र सदर आंदोलन चिघळून टाकण्याचा कर्नाटक एम्टा प्रशासनाचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून आंदोलनकर्त्या १५ कामगारांवर खोटा आरोप लावला. त्यामुळे त्यांना अटक केल्याचा आरोप राष्ट्रीय कोयला कामगार संघर्ष संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मोहोड यांनी पत्रपरिषदेत केला.१ नोव्हेंबर २०१४ पासून सुरू होणाऱ्या नवीन वेतन श्रेणीच्या मागणीवरुन कामगारांचा एम्टा प्रशासनासोबत वाद सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून काही प्रमुख कामगारांना कंपनीने दुसऱ्या राज्यातील आपल्या कोळसा खाणीत बदली केली. एवढेच नाही तर कॅन्टींग बंद केली. याठिकाणी कार्यरत कॅप्टीव्ह कोयला मजदूर काँग्रेस (इंटक) आणि राष्ट्रीय कोयला कामगार संघर्ष संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एस. क्यू. जामा, प्रमोद मोहोड यांनी सुरुवातीला एम्टा प्रशासनासोबत समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यश न आल्याने अखेर २२ सप्टेंबरपासून खाण बंद आंदोलन सुरु केले. सदर आंदोलन शांततेत सुरु असताना पोलिसांच्या देखरेखीत बाहेरील कामगारांना कामावर लावून खाण सुरु केली. या प्रकाराने संपावरील कामगार चिडले. शांतता भंग करतील असे प्रशासनाला वाटत होते. परंतु तसा प्रकार न घडल्याने अखेर बाहेरील कामगार विजयसिंग रायबहादुरसिंग याला एम्टा व पोलीस प्रशासनाने १५ प्रमुख कामगाराच्या विरोधात मारहाणीची तक्रार द्यायवयाला लावली असा आरोप मोहोड यांनी केला. २३ सप्टेंबरला सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयस्वाल, ठाणेदार परघने यांनी १५ कामगारांना अटक केली. यात विशाल दुधे, महेश पेटकर, दिनेश वानखेडे, संदीप घुगूल, उपेंद्र यादव, तालेश्वर वर्मा, राजेंद्र यादव, मनोज राय, हाकीमचंद पांडे, प्रमोद ठाकूर, अभिजीत मालाकार, अनिल प्रेमसागर तिवारी, अरविंद देवगडे, परशुराम यादव या कामगारांचा समावेश आहे. या सर्वांवर शांतता भंग करणे, मारहान व तीक्ष्ण शस्त्राने मारहाण करणे या स्वरुपाचे खोटे गुन्हे लावल्याचा आरोपही त्यांनी केला.कंपनी कामगारांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कामगार संघटना तसे होऊ देणार नसून कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचेही ते म्हणाले. कंपनी पोलिसांना हाताशी घेऊन कामगार कायद्याचा भंग करीत असल्याचा आरोपही मोहोड यांनी केले. पत्रपरिषदेला धनंजय गुंडावार, संजय दुबे यांच्यासह कामगार नेते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
एम्टा व पोलीस प्रशासनाद्वारे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न
By admin | Updated: September 24, 2014 23:28 IST