चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या विविध २६ मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा शेवटचा टप्पा १ आॅगस्ट २०१४ पासून सुरू होत आहे. यामध्ये राज्यातील संपूर्ण महसूल कर्मचारी संपावर जाणार आहे. संपात प्रामुख्याने पदोन्नत नायब तहसीलदार, अव्वल कारकून, कनिष्ठ लिपीक, शिपाई व वाहन चालक या संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार असून राज्यातील जवळपास पंचविस हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे, महसूल विभागाचा १ आॅगस्ट हा महसूल दिन असतो. या दिवसापासूनच महसूली वर्षाला सुरुवात होऊन सर्व महसूली लेखे, कार्यालयीन नोंदवह्या नव्याने सुरू होत असतात. परंतु कर्मचारी संघटनेने याच दिवसापासून संपाला सुरुवात केल्याने सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे. या आंदोलनाची सुरुवात चंद्रपुरातून करण्यासाठी राज्य अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे हे २३ जुलैला चंद्रपुरात येत असून ते यावेळी कर्मचाऱ्यांना आंदोलन व मागण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे. प्रत्येक तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी सभेला उपस्थित राहावे, अशी विनंती महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू धांडे यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
महसूल दिनापासून कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
By admin | Updated: July 22, 2014 23:56 IST