‘बिबट तुम्हचा’ : वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अरेरावीपणा राजू गेडाम मूलतालुक्यातील ताडाळा येथील शेतशिवारात आजारी बिबट आढळल्यानंतर त्यांची देखभाल व्हावी या उद्देशाने त्याला चंद्रपूरच्या रामबाग रोपवाटीकेत ठेवण्यात आले. बिबट्याची देखभाल करण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे आवश्यक असताना चक्क मूल परिक्षेत्रातील वनरक्षक, वनमजुरांची ‘पार्सल’ आणली जात आहे. त्यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळत असून अधिकारी ‘तुम्हचा बिबट’ ही संज्ञा देऊन अरेरावीपणा करीत असल्याचे बोलले जात आहे.चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील ही पहिलीच बाब नसून यापूर्वी १४ एप्रिल २०१३ ला चिचपल्ली-गोंदिया रेल्वे लाईनवर एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ जखमी झाला होता. या जखमी वाघाला नागपूरच्या सेमिनरी हिल्स रोपवाटीकेत ठेवल्यानंतर त्यांच्या देखभालीसाठी चिचपल्ली परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. सतत दोन वर्षे कर्मचाऱ्यांचा मूल-चिचपल्ली- नागपूर असा प्रवास करावा लागला. या काळात त्यांच्या परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड केली जायची. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश महत्त्वाचे असल्याने ते मानसिक त्रास निमूटपणे सहन करीत होते. या काळात वाघाच्या देखभालीवर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. हिच स्थिती आता ताडाळा येथे सापडलेल्या बिबट्याच्या देखभालीसाठीही दिसून येत आहे. वनमजुरांना अधिकाऱ्यांच्या सेवेत लावू नये, असे स्पष्ट आदेश असताना सर्वच अधिकाऱ्यांच्या घरी वनमजूर काम करताना दिसतात. तेच वनमजूर बिबट्याच्या देखभालीसाठी लावले तर भत्त्यासाठी होणारा खर्च थांबविता येईल. त्याबरोबरच वनकर्मचारी आपल्या क्षेत्रात राहत असल्यास अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर करडी नजर राहील. जेथे बिबट सापडला त्याच परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची देखभालीसाठी नियुक्ती करावी, असा नियम नाही. मात्र चंद्रपूर विभागात कर्मचारी कमतरता असल्याने बिबट्याच्या देखभालीसाठी चिचपल्ली परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. बिबट्याचे संरक्षण व्हावे, कर्मचाऱ्यांवर ताण पडू नये व वनाचे संरक्षण व्हावे यासाठी वनविभाग प्रयत्नरत आहे.- विवेक मोरे,सहायक वनसंरक्षक, चंद्रपूर
बिबट्याच्या देखभालीसाठी कर्मचाऱ्यांचे ‘पार्सल’
By admin | Updated: July 7, 2015 00:59 IST