लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : हिवाळ्याची थंडीत ताज्या तुरीच्या शेंगा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा त्या काही प्रमाणात महागल्या आहेत. तरी त्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असून, थकवा कमी करण्यासाठी मॅग्नेशियम लोहयुक्त शेंगांचे सेवन करणे, हा पर्याय आहे.
तूरडाळीतील फायबरमुळे पचन सुधारते. अँटिऑक्सिडंट्स रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत होते. त्याचे दाहक विरोधी गुणधर्म खोकला आणि ब्राँकायटिसची लक्षणे दूर करण्यात मदत करतात.
तुरीच्या शेंगांच्या रेसिपी तुरीच्या शेंगापासून आमटी, कडी, उसळ, चाट, पेंटिस, सुकी भाजी, कटलेट, आळण, दाणेभात, असे अनेक पदार्थ तयार केले जातात. मात्र, नुसते मीठ घालून पाण्यात उकडलेल्या तुरीच्या शेंगादेखील चवीला उत्कृष्ट लागतात.
...तर अॅसिडिटी होत नाही तुरीच्या शेंगांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असते. तसेच कॅल्शियमदेखील मुबलक प्रमाणात असून तूर हे पोटॅशियम, मॅग्नेशियमचाही चांगला स्रोत मानले जातात. ही सर्व खनिजे उत्तम आरोग्यासाठी गरजेची असतात. त्यासोबतच यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि फायबरदेखील आहे. ताज्या तुरीचे दाणे खाल्ले तर त्यामुळे तुम्हाला अॅसिडिटी होत नाही.
शेंगा उकडून खातात आवडीने या दिवसांत तुरीच्या ओल्या शेंगांना मोठी मागणी असते. बहुतांश नागरिक भाजीत तुरीचे ओले दाणे टाकतात. तसेच या शेंगा उकडून आवडीने खाल्ल्या जातात. वाटाण्याऐवजी हे दाणे वापरतात. यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. तसेच व्यापारीवर्गालाही यातून दोन पैसे मिळत असल्याने अनेकजण या शेंगांची खरेदी- विक्री करीत रोजगार मिळवताना दिसत आहेत.
का महागल्या तुरीच्या शेंगा?तुरीच्या शेंगांचे पीक तयार होण्याच्या स्टेजवर हवेतील थंड वातावरण पिकावर बसणाऱ्या अळीला पोषक ठरते. ज्यामुळे तुरीच्या दाण्यांचे नुकसान होते. प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी आवश्यक कीटकनाशकदेखील महाग आहेत. त्यामुळे झालेले नुकसान आणि उरलेले पीक वाचण्यासाठी झालेला खर्च याचे मार्जिन सांभाळण्यासाठी या शेंगांची। चढ्या भावात विक्री करावी लागते, असे शेतकरी सांगतात.