लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: सकाळी अचानक कुठे पायाखालची जमीन हलली तर कुणाच्या घरातील भांडी कोसळली. काहींना बसल्या जागीच गरगरल्याचे जाणवले. नागरिक धास्तावून घराबाहेर निघाले. या धक्कादायक प्रकाराबाबत चौकशी केली असता असा प्रकार शेजारच्या व्यक्तींनीही अनुभवल्याचे आढळून आले. तोपर्यंत हा भूकपाचा धक्का असल्याचे मेजेस सोशल मीडियावरून व्हायरल झाले. नऊ तालुक्यांतील नागरिकांसाठी बुधवार (दि. ४) ची सकाळ अशी थरार घेऊन आली होती.
चंद्रपुरातील काही वॉर्डासह गोंडपिपरी, पोंभूर्णा, मूल, सावली, कोरपना, सिंदेवाही, नागभीड व चिमूर तालुक्यात बुधवारी सकाळी नेहमीचा दिनक्रम सुरू असताना सकाळी ७:२७ वाजेच्या सुमारास सौम्य धक्का बसला. या धक्क्याने काहींच्या घरातील भांडी कोसळली, पायाखालची जमीन हलली. काहींच्या घरातील फ्रीजही हलला. खाली बसलेल्यांना सौम्य स्वरूपात गरगरल्याचे जाणवले. दारे, खिडक्या व घरातील सामान हलल्याने नागरिक काही काळ संभ्रमात होते. अचानक उद्भलेल्या या घटनेने कुटुंबातील मंडळींची त्रेधातिरपीट उडाली. जो तो व्यक्ती नेमके काय झाले, याबाबत जिल्ह्याभरात नागरिकांमध्ये मोठी चर्चा होती.
रिश्टर स्केलवर ५.३ तीव्रतेची नोंद बुधवारी (दि. ४) सकाळी ७:२७ वाजता नऊ तालुक्यांत भूकपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर ५.३ तीव्रतेची नोंद झाली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात असा प्रकार कुठे कुठे घडला, याबाबत प्रशासनाकडून दिवसभर माहिती गोळा करण्यात आली.
येथे बसले सौम्य धक्के चंद्रपुरातील काही वॉर्ड, गोंडपिपरी तालुक्यात खराळपेठ व पुरडी हेटी, पोंभुर्णा, सावली, कोरपना, सिंदेवाही, नागभीड, मासळ, धाबा येथेही हलकासा झटका जाणवला. घोसरी-नांदगाव परिसरातही सौम्य धक्के जाणवले, राजोलीत जमीन हलल्याचे नागरिकांनी सांगितले. दररोज सकाळची कामे करताना अचानक असा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
"चंद्रपूर जिल्ह्यातील मूल-गोंडपिपरी व गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा हा भूभाग निओ टेकटोनिक म्हणून गणला जातो. असा भूभाग भूकंपप्रवण क्षेत्र तीनमध्ये येतो. २ ते ३ रिश्टर स्केलचे भूकंप यापूर्वी आले होते. पुढेही येऊ शकतात. कदंब फाल्टमुळे यवतमाळ जिल्ह्यातील वणी व मुकुटबन क्षेत्र है अल्प प्रमाणात भूकंपप्रवण क्षेत्र आहे. भविष्यात चंद्रपूर व विदर्भात मोठ्या भूकंपाची शक्यता नाही." - प्रा. सुरेश चोपणे, भूशास्त्र अभ्यासक, चंद्रपूर
"चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले हे खरे आहे. याबाबत तज्ज्ञांकडून माहिती गोळा केली जात आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी, घाबरून न जाता इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा." - विनय गौडा जी. सी. जिल्हाधिकारी, चंद्रपूर
नागरिक म्हणतात..."घरी सकाळी बसून असताना अचानक टीव्ही, पंखा व समोरील काचेची खिडकी हलली. अगदी ४ ते ५ सेकंदात असे का झाले हे कळलेच नाही. हा भूकंपाचाच सौम्य धक्का आहे. याबाबत लगेच 'लोकमत' प्रतिनिधीला फोनद्वारे कळविले." - कैलास टहलियानी, सिंदेवाही
"माझी मुलगी सकाळी शाळेत जाण्याकरिता तयारी करीत होती. सकाळी घरातील वातावरण शांत असताना दरम्यान, अचानक वरच्या मजल्यावरील समोरील खोलीतील खिंडकी हलली. असाच प्रकार अन्य नागरिकांसोबतही घडला आहे." - योगेश तालेवार, सिंदेवाही
"सकाळी झोपेत असताना कुणीतरी धक्का दिल्याचे जाणवले. त्यामुळे लगेच जागा झालो. काही क्षणासाठी मनात भीती निर्माण झाली. उठवून थोड्या वेळाने मोबाईल बघितले असता भूकंप झाल्याची माहिती मिळाली. तालुक्यातील माझे मित्र मंडळीहीनी आपला अनुभव मला मोबाईलवरुन सांगितला." - यशपाल गोंगले, सावली
"सकाळी घरात बसून असताना अचानक स्वयंपाकगृहातील भांड्यांचा आवाज आला. घरची भित हलली. त्यामुळे घाबरलो व बाहेर निघालो. चौकशी केली असता शेजारच्यांनाही हाच अनुभव आल्याचे आढळले."- विनोद धोडरे, वार्ड नं.४ पोंभूर्णा
"झोपेत असताना अचानक धक्का बसल्याने जागा झालो. ही माहिती वडिलाला दिली. धक्क्याने बेडच्या बाजूला वस्तू पडल्या होत्या. असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. हे कसे घडले मला समजलेच नाही." - सरस दाँतुलवार, जाकीर हुसेन वॉर्ड बल्लारपूर