चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासकीय कार्यालयांना पत्र मिळताच कार्यालयातील धूळ साफ होऊ लागली आहे. मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अनेक फाईल आता स्वच्छ होणार असून गांधी जयंतीपासून या कार्याला गती येणार आहे. विशेष म्हणजे, कर्मचारी स्वच्छतेसाठी शपथ घेणार आहे. त्यानंतर श्रमदान करून प्रत्येक दिवशी दोन तास स्वच्छतेसाठी देणार आहे.स्वच्छता अभियानांतर्गत आठ बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात कर्मचारी स्वत: प्रत्येक दिवशी दोन तास श्रमदान करणार आहे. प्रत्येकांनी श्रमदान करून स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येकांनी किमान १०० जणांना स्वच्छतेसाठी प्रेरित करण्याचा संकल्प करण्याचे सांगण्यात आले आहे. राज्याचे नगर विकास विकास मंत्रालयातून जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदेलाही पत्र मिळाले आहे. आॅक्टोबर महिन्याला स्वच्छता महिना घोषित करण्यात आले आहे.नगर विकास मंत्रालयातून जिल्हा परिषदेला मिळालेल्या पत्रानुसार २ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत सदर अभियान सुरु ठेवण्यात येणार आहे. प्रथम महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्वांना शपथ घ्यायची आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेतील अधिकारी या कामाला लागले असून सदर काम जोमाने करू, असे मत मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी व्यक्त केले आहे. याव्यतिरिक्त सर्व पंचायत समिती तसेच ग्राम पंचायतस्तरावरही स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)
कार्यालयातील धूळ होणार साफ
By admin | Updated: October 1, 2014 23:19 IST