नागरिक त्रस्त : मुख्य नालीच झाली जमीनदोस्तदुर्गापूर : ऊर्जानगर वस्तीतील सांडपाणी वाहून नेणारी चंद्रपूर - ताडोबा मार्गालगत असलेली मुख्य नाली आजतागयत कधीच साफ केली नाही. घाणीने तुंबून ही नाली जमीनदोस्त झाली आहे. परिणामी देशी-विदेशी पर्यटक ज्या मार्गाने जातात, त्या ताडोबा राज्य महामार्गावरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ऊर्जानगर ग्रामपंचायतीच्या केसरीनंदन नगर परिसरासभोवताली असलेल्या नाल्या चंद्रपूर - ताडोबा मार्गालगतच्या मुख्य नालीला जोडल्या आहेत. ही मुख्य नाली उर्जानगर ग्रामपंचायत व चंद्रपूर महानगरपाालिकेची हद्द दर्शविणाऱ्या एका मोठ्या नाल्याला जोडण्यात आली आहे. वस्तीतील लोकांच्या घरातील सांडपाणी वाहून या मुख्य नालीत येते. येथून ते पाणी वाहत मोठ्या नाल्याद्वारे बाहेर निघायला पाहिजे. मात्र या नाल्याला जोडणारी चंद्रपूर - ताडोबा मार्गावरील मुख्य नाली मागील कित्येक वर्षापासून स्वच्छ करण्यात आली नाही. त्यामुळे ही नाली प्लॅस्टिक पिशव्या, केरकचरा व घाणीने तुंबून जमीनदोस्त झाली आहे. आता वस्तीतील नाल्यातून वाहून येणारे सांडपाणी थेट ताडोबा राज्य महामार्गावर साचत आहे. याशिवाय वस्तीतील जोड नाल्याही ओव्हरफ्लो होऊन त्याचे पाणी वस्तीत घुसण्यास सुरूवात झाली आहे. एकुणच या वस्तीच्या दर्शनी भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे अद्यापही लक्ष नाही. पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मान्सूनपूर्व या नालीची साफसफाई करून पाणी जाण्याकरिता ती मोकळी करणे आवश्यक आहे. अन्यथा या महामार्गावर सांडपाण्याचे तळे तयार होणार आहे. (वार्ताहर)
ताडोबा राज्यमार्गाला पडला घाणीचा विळखा
By admin | Updated: May 17, 2016 00:38 IST