ब्रह्मपुरी : तालुक्यातील हळदा गावात आज सोमवारी बिबट्याने हैदोस घालत चार जणांनी जखमी केले. अचानक बिबट्याने गावात येऊन हल्ले करणे सुरू केल्याने गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभाग, पोलीस प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांची चांगलीच तारांबळ उडाली. आज सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक बिबट राजेंद्र भोयर यांच्या धाब्याजवळ काही जणांना दिसला. भोयर यांच्या धाब्याजवळच बिबट्याचे वास्तव्य असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजेंद्र भोयर यांच्यावर बिबट्याने प्रथम हल्ला केला. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. गावकऱ्यांनी बिबट्याला तिथून हाकलून लावल्यानंतर दहा घराच्या छतावरून जाऊन गावालगतच्या बोडीकडे तो पळाला. त्यानंतर वनविभागाला सूचना दिल्यानंतर त्या भागाचे वनरक्षक कावळे आपल्यासोबत दोन वनमजूरांना घेऊन घटनास्थळी गेले असता वनमजूर बापूजी दडमल यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर वनविभागाचे उपवनक्षेत्राधिकारी, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड येथील वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लगेच वन्यजीव सुरक्षा रक्षक टिमसुद्धा हळदा येथे पोहचली. बिबट अगदी गावालगतच असल्याने शार्पशूटरलाही पाचारण करण्यात आले. त्यांनी बिबट्याला मारण्यासाठी नेम धरला असता बिबट्याने शूटरवर हल्ला केला व त्यालाही जखमी केले. नंतर जाळे टाकून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नात वनरक्षक तोडासे जखमी झाले. दुपारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट्याला ंिपंजऱ्या जेरबंद करण्यात आले. (प्रतिनिधी)
बिबट्याने घातला गावात धुमाकूळ
By admin | Updated: June 16, 2015 01:09 IST