चंद्रपूर : स्वच्छता आणि आरोग्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. मात्र महापालिकेने उभारलेल्या स्वच्छतागृहाचीच दुरवस्था झाली आहे. नागरिक या स्वच्छतागृहाअभावी बाजूला असलेल्या रिकाम्या जागेचा वापर करीत असल्याचे विदारक चित्र जटपुरा गेट परिसरात बघायला मिळत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन स्वच्छतागृहाची स्वच्छता करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी चंद्रपूर शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहे. मात्र त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी नागरिकांना दुर्गंधीतच प्रातर्विधी आटोपावा लागत आहे. येथील जटपुरा गेटच्या अगदी लगत असलेल्या स्वच्छतागृहाची अवस्थाही बिकट झाली आहे. महिलांसाठी येथे व्यवस्था नसल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे.
दुरवस्थेमुळे जटपुरा गेट परिसरातील स्वच्छतागृह शोभेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST