घुग्घुस : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम चार दिवसांपूर्वी झाले. सिमेंट कॉंक्रीटच्या बांधकामानंतर त्यावर बिडींग करून त्यात पाणी साचवून ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. मात्र यासाठी ठेकेदाराकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. अशाच प्रकारचे काम वॉर्ड क्रमांक सहा महिन्यापूर्वी करण्यात आले. मात्र या रस्त्यावर पाणीच मारण्यात न आल्याने सिमेंट रस्त्याला तडे गेले. त्यामुळे या रस्त्याची देखील तिच दुर्दशा होईल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे रस्त्याची ही कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष सदस्यच करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. घुग्घुस गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते व्हावे, या उद्दात हेतूने शासनाच्या व जिल्हा परिषद फंडातून कामे मंजूर करण्यात आली. ही कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहेत. अधिकतर कामे झाली आणि मार्च अखेर असल्याने दिवसरात्रं करून रस्ते पूर्ण केले व करण्यात येत आहेत. येथील ग्रामपंचायत सदस्यांकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या कामामध्ये ग्रामपंचयातीचे मजूर वापरण्यात येत नाही. पण सदस्यांकडून या मजुरांचा वापर केला जात आहे. विरोधी सदस्यांनी याबाबत ग्रामसेवकाकडे तक्रार केली असून यासंदर्भात चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.चार दिवसांपूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम झाले. रस्ता अधिक मजबूत व्हावा, यासाठी त्या रस्त्यावर आरे तयार करण्यात आले. मात्र रस्त्यावर केवळ आरेच आहेत. त्यात पाण्याचा पत्ताच नाही. वस्तुस्थिती अशी आहे. सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आणि आता या रस्त्यालादेखील भेगा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गावात सध्या सिमेंट रस्ते व भूमिगत नाल्यांचे काम सुरू असले तरी त्यावर कोणत्याही प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची देखभाल नसल्याने ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. संबधित ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.(प्रतिनिधी)लाखो रुपये खर्च करून सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र रस्त्यांच्या देखभालीकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. सत्ताधारीही कंत्राटदाराच्या बाजुने झुकते माप देत असल्याने कंत्राटदाराचे चांगलेच फावत आहे. कोणताही रस्ता तयार करताना कंत्राटदार आपली ‘मार्जीन’ सोडूनच काम करतो. अधिकचे पैसे कमविण्यासाठी त्याचा खटाटोप सुरू असतो. त्यात सत्ताधाऱ्यांचाही वाटा असतो. घुग्घूस शहरातील रस्ता बांधकामातही तसेच घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पाण्याअभावी रस्त्याला तडे जाणार
By admin | Updated: April 1, 2015 01:11 IST