मूल : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या गोंदिया ते बल्लारपूर डेमू रेल्वेगाडीमध्ये जास्तीचे अंतर धावण्याची क्षमता नसल्याने वारंवार तिची सेवा खंडित होत असल्याचे दिसून येत आहे. १२० किमी अंतरापर्यंत लोकल प्रवासी वाहतुकीसाठी डेमू उपयुक्त असल्याचे बोलले जाते. असे असतानाही रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डेमू २५० किमीपेक्षा जास्तीचे अंतर रोज पार करीत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या मुलवरुन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या चार पॅसेंजर आणि दोन एक्सप्रेस गाड्या धावतात. दुपारी मूल मार्गावरुन जाणारी डेमू सायंकाळी सहा वाजता चांदाफोर्ट रेल्वेस्थानकावरुन परतीच्या मार्गावर निघते. गोंदिया ते बल्लारपूर या रेल्वेमार्गाचे अंतर जवळपास २५० किमी एवढे आहे.मुळात डेमू रेल्वेगाडी लोकल प्रवासी वाहतुकीसाठी उपयुक्त आहे. असे असताना ती जास्तीत जास्त अंतर पार करीत असल्याने डेमूच्या इंजिनची तेवढी क्षमता नसल्याने या मार्गावर ती वारंवार खंडित आहे. जवळपास डेमू १२० किमी अंतरापर्यंत धावू शकते. तिच्यात जास्त अंतर धावण्याची क्षमता नाही, असे मूल येथील रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गोंदिया ते बल्लारपूर हा मार्ग फार लांबीचा असल्याने डेमूची सेवा नागभीड ते चंद्रपूर अशा लोकल प्रवासासाठी उपयुक्त ठरु शकते, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाने डेमू रेल्वेगाडीची क्षमता न तपासता सरळ सरळ ती जास्तीच्या अंतरासाठी प्रवाशांसाठी पॅसेंजर गाडी म्हणून सुरू केली. त्यामुळे डेमूच्या इंजिनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्याने अनपेक्षितपणे ती कुठेही बंद पडते. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. (तालुका प्रतिनिधी)
क्षमता नसल्याने डेमू रेल्वेत बिघाड
By admin | Updated: August 1, 2014 00:13 IST