दुर्गापूर : ताडोबातील बफर पर्यटकांची जंगल सफारी करवून मिळणाऱ्या उत्पन्नातून संसाराचा गाडा हाकणासाठी या झोनमधील युवकांनी कर्जबाजारी होऊन जिप्सी खरेदी केल्या. मात्र त्यांच्या या भागातल्या जंगल सफारीवर मोहर्लीतील जिप्सीधारक डल्ला मारीत असल्याने त्यांना जंगल सफारीच्या फेऱ्या मिळने कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा, मोहर्ली, कोळसा वनपरिक्षेत्र कोअर झोन अंतर्गत येतात. येथील निसर्गरम्य जंगल व यात असलेले रुबाबदार व धस्टपुष्ट वाघासह इतर वन्यजीव जगभर प्रसिद्ध आहेत. याच कारणाने येथे वर्षभर पर्यटकांची रीघ लागलेली असते. मोहर्ली गाव परिसरात ताडोबाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. देश-विदेशातून येणारे पर्यटक थेट येथे येऊन आसपास असलेल्या रिसोर्टमध्ये थांबतात. प्रत्येक रिसोर्टवाल्यांशी मोहर्लीतील जिप्सी धारकांचा संपर्क असतो. त्यामुळे कोअर व बफर झोन अशा दोन्ही जंगल सफारीच्या फेऱ्या येथीलच जिप्सीधारकांना मिळतात. मात्र खास बफर झोन करीता नेमण्यात आलेल्या जिप्सीधारकांना पर्यटकांकडून क्वचीतच जंगल सफारीच्या फेऱ्या मिळत आहेत. या जिप्सींना कोअर झोन मध्ये जंगल सफारीस (ताडोबात) बंदी आहे.केवळ बफर झोन मधील जंगल सफारीच्या भरवशावर आगरझरी, देवाडा, अडेगाव, जुनोना या बफर झोन मधील युवकांनी कर्जबाजारी होऊन जिप्स्या खरेदी केल्या. ते गावातून रोज सकाळी नवरगाव चौकी जवळ असलेल्या दोन्ही बफर झोन प्रवेशद्वारावर जिप्सीसह येतात, अशा १३ जिप्सी येथे असतात. एखाद्याला फेरी मिळाली तर मिळते उर्वरीत जिप्सी गावाकडे परत जातात. नंतर दुपारी परत येथे येतात, त्यावेळेसही त्यांना खाली हातानेच परतावे लागत असल्याने असंतोष वाढला आहे. (वार्ताहर)
बफर झोनमधील जिप्सीधारकांवर उपासमारीची पाळी
By admin | Updated: May 4, 2015 01:18 IST