पनवेल : तालुक्यात पाचशेपेक्षा जास्त मुले - मुली शिक्षणापासून वंचित असल्याची माहिती शनिवारी झालेल्या शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेतून प्राप्त झाली आहे. त्यापैकी निम्म्यांहून अधिक मुले मध्येच शाळा सोडून देणारे आहेत. या सर्वांना शाळेत प्रवेश देवून मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प शिक्षण विभागाने केला आहे.पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा या सिडको कॉलनीबरोबरच ग्रामीण भागात शनिवारी शासनाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. १०० घरांकरिता एक प्रगणक नियुक्त करण्यात आला होता. २० प्रगणकांचा एक झोन, त्यांच्यावर एका नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली होती. अशा प्रकारे पनवेल तालुक्यात १२० झोन पाडण्यात आले होते. विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये जावून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला, याशिवाय खास मोबाइल टीम सुध्दा तयार करण्यात आली होती. शनिवारी रात्रीच जमा केलेली सगळी माहिती जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली. पनवेल परिसरात एकूण ५४५ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यापैकी अडीचशेच्या आसपास मुलांनी मध्येच शाळा सोडून दिल्याची माहिती प्राप्त झाली. तीनशे मुला-मुलांनी शाळेचे तोंड सुध्दा पाहिले नाही. या सर्व मुला-मुलींची माहिती जमा करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.या मोहिमेत प्रांताधिकारी सुदाम परदेशी, कामगार उपायुक्त श्याम जोशी, तहसीलदार दीपक आकडे, गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील, गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, निवासी नायब तहसीलदार बी.टी. गोसावी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या मोहिमेत सापडलेल्या सगळ्या मुलांना आधार कार्ड सुध्दा देण्यात येणार आहेत. याशिवाय त्यांना जवळच्या शाळेत प्रवेश देवून गणवेश व शालेय साहित्य दिले जाणार आहेत. (वार्ताहर)
खरिपावर संकटाचे सावट
By admin | Updated: July 6, 2015 00:44 IST