वनसडी : कोरपना या तालुकास्तरावर असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरूवातीच्या १५ दिवस वगळता थेंबभरही पाणी देऊ न शकल्याने गेल्या १५ वर्षांपासून कुचकामी ठरली गेली आहे.शहरातील मध्यवस्तीत तयार करण्यात आलेली पाण्याची टाकी पाण्याविना कोरडी पडलेली आहे. सुरुवातीला शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले नळ व नळाच्या तोट्या आज दिसेनास्या झाल्या आहेत. नळयोजनेची पाईपलाईन पूर्णत: निकामी झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कुपनलिकेच्या पाण्याशिवाय पर्याय उरत नाही. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास पाण्याची मोठी अडचण भविष्यात मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील अनेक कुपनलिकेतील पाणी दूषित आहे. त्यामुळे केस गळती, त्वचेचे विकार आदि समस्यांनी नागरिकांना ग्रासले आहे. करोडो रुपये खर्चून तयार करण्यात आलेली पाण्याची टाकी काय कामाची? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. दिवसेंदिवस शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या या दृष्टीने येथील नळयोजनेची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.याकडे अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरपनाकरांना नळाचे पाणी केव्हा चाखायला मिळणार, याबाबत अजुनही साशंकताच आहे. येथील नळयोजनाच्या दुरूस्तीचे तातडीने काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
कोरपन्याची पाणी पुरवठा योजना कुचकामी
By admin | Updated: October 8, 2014 23:24 IST