नवरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु निसर्गांच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी धान पिक वाळत आहे. त्यामुळे शेतकरी धानाची पात कापून गुरांना चारा टाकत आहे.यावर्षी पावसाने जून-जुलै मध्येच पाठ फिरविली. त्यानंतर पाऊस आला आणि शेतकरी शेतीच्या कामाला लागले. कशीबशी धान रोवणीची कामे केली मात्र निसर्गाने पाठ फिरविली. सिंदेवाही तालुक्यात भात (धान) पीक हे मुख्य असून संपूर्ण शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतकरी धान पीक घेतो आणि त्यावरच कुटुंबाची गुजराण करतो. मुलांचे शिक्षण औषध दवाखाना आदी सर्व खर्च शेतीतून आलेल्या पिकांवरच करावा लागतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. त्यातच शासनही शेतपिकांना योग्य भाव देत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.यावर्षी निसर्गाने पाठ फिरविली असल्याने शेती संकटात सापडले आहे. नवरगाव परिसरातील शेतकऱ्यांना घोडाझरी नहर यावर्षी लवकर बंद झाल्याने शेतातील धान धोक्यात आले आहे. काही शेतकऱ्यांची धानाची पाल झाल्याने कापूस बैलांना चारत आहेत तर काही शेतकरी इकडून तिकडून पाणी विकत घेऊन शेती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. घेतलेले कर्ज कसे फेडायचे अशा विंवचनेत शेतकरी सापडला आहे. त्यातच काही धान शेतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एकूणच शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. आता तरी शासनाने शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
धान पीक पाण्याअभावी वाळले
By admin | Updated: October 28, 2014 22:53 IST