रस्ता अडविला : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर शुक्रवारला आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात अनेक घोषणा दिल्या. राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नाही. कर्जमाफीसंदर्भातील निर्णय रोज बदलत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत शिवसेना आंदोलन चालूच ठेवणार आहे, असे यावेळी आमदार धानोरकर यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून बँकांमध्ये शिवसेना कर्जमाफी शेतकरी आणि प्रत्यक्षात मदत मिळालेल्यांची यादी गोळा करीत आहे. त्यासाठीच जिल्हा बँकेच्या समोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात विविध घोषणा दिल्या. नागपूर-गडचिरोली मार्ग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत माहिती जाणून घेतली. आंदोलनात जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, संदीप गिऱ्हे, राजेश नायडू, भारती दुधानी सहभागी झाले होते.
ढोल वाजवा आंदोलन
By admin | Updated: July 9, 2017 00:47 IST