चालकाला अटक : कोरपना पोलिसांची कारवाईकोरपना : दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारु तस्करांकडून दारुच्या वाहतुकीसाठी आणि तस्करीसाठी नवनवीन शक्कल लढविण्यात येत असल्याचे उजेडात येत आहे. वाहन चालकाची अशीच एक हुशारी कोरपना पोलिसांनी वनोजा फाट्याजवळ पकडली. चालक हा वाहनाच्या बोनेटमधून दारु तस्करी करीत होता. पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाखांचा दारुचा साठा जप्त केला आहे.एका वाहनातून दारुतस्करी होत असल्याची गोपनीय माहिती कोरपना पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एमएच ३४/के ५१११ या क्रमांकाचे वाहन अडवून कसून झडती घेतली असता चालकाने आपण दारू विक्री करीत नाही, असे वारंवार पोलिसांना सांगितले. परंतु चालक गाडीच्या बोनेटला चिपकून असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला बोनेट उघडायला सांगितले. परंतु तो बोनेट गरम असल्याच्या बहाना करीत होता. पोलिसांनी बोनेट उघडताच बोनेटमध्ये देशी- विदेशी दारुचा साठा आढळून आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय शुक्ला, अशोक राणे, पोलीस शिपाई नितेश महात्मे, विजय धोटे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)
वाहनाच्या बोनेटमधून दारुची तस्करी
By admin | Updated: February 14, 2016 01:03 IST