कोेट्यवधीचा खर्च व्यर्थ : सिंचनाअभावी शेती लागली सुकायलाप्रकाश काळे गोवरीशासनाने जुने बंधारे पूर्ण होण्याआधीच नवीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली. या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र वाढीव निधीअभावी अनेक बंधारे रखडल्याने सिंचनाच्या सोयीसाठी बांधलेले अनेक बंधारे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनाचा सिंचनाखाली शेती आणण्याचा उद्देश पूर्ण तर झाला नाहीच. उलट शासनाचा कोट्यवधींचा खर्च व्यर्थ गेला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी मिळणे कठीण झाल्यामुळे शेती पिकविणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. त्यामुळे शेती डबघाईस येण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचाच आधार घेऊन शासनाने शेती सिंचनाखाली येण्यासाठी व शेतीला वर्षभर मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने शेतीला पुरक असे अनेक बंधारे बांधण्यात आले.काही बंधाऱ्यात पाणी अडल्याने शासनाचा शेतीविषयीचा मुख्य उद्देश सफल झाला. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य धोरणामुळे अनेक बंधाऱ्यातील बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र पाण्याचा एक थेंबही अडला नाही. उलट बंधारा अर्धवट असल्याने बांधकामात वापरलेले लोखंडी साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याने बंधाऱ्यांचे नेमके किती काम झाले हे कळायला मार्ग नाही. अशा अनेक बंधाऱ्यात अधिकारी व कंत्राटदारांनी आपले खिसे गरम करून घेतले.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावर गेल्या दहा-बारा वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाविषयी आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतीला बंधाऱ्याचे पाणी मिळणार असल्याने उत्पन्नात वाढ होईल, अशी आस भोळ्याबापड्या शेतकऱ्यांना होती.मात्र सरकारी कामच ते. कधी काम बंद पडेल याचा नेम नाही. आणि झालेही तसेच. अचानक बंधाऱ्याचे काम बंद पडले. आज ना उद्या बंधाऱ्याचे बांधकाम सुरू होईल, या आशेवर शेतकरी होते. या कालावधीत राजुरा विधानसभेचे तीन आमदार बदलले. मात्र बंधाऱ्याचे बांधकाम अजूनही अर्धवट अवस्थेतच असल्याचे दिसते.
हरितक्रांतीचे स्वप्न भंगले!
By admin | Updated: October 11, 2015 02:11 IST