चंद्रपूर : मागील वर्षी एपीजे अब्दुल कलाम स्मृती निसर्ग उद्यानाबाबत केलेले वक्तव्य आज पूर्णत्वास करताना मला अत्यानंद होत आहे. ज्याप्रमाणे निसर्ग उद्यानाच्या पहील्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले. त्याचप्रमाणे पुढीलवर्षी दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच उद्यानासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे अभिवचन त्यांनी दिले. ते सोमवारी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात वनविकास महामंडळाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या निर्सग उद्यानाच्या लोकर्पण सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. संजय धोटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधीकारी आशुतोष सलिल, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंद्र सिंग, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, जि.प. सभापती देवराव भोंगळे, तुषार सोम, निलेश खरबडे आदींची उपस्थिती होती. भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम हे बहूआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ निसर्ग उद्यान निर्माण करण्याचा संकल्प मी केला होता. आज तो पूर्णत्वास नेताना आनंद होत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. वनसंवर्धन कायद्यातंर्गत परवानगी न मिळाल्याने बरीच कामे अपूरी आहेत. ती कामे येत्या वर्षभरात पूर्ण करुन दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण स्वातंत्र्य दिनी करु, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उद्यानाची विस्तृत माहिती देणाऱ्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक एस.एस.डोळे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्मृती निसर्ग उद्यानाचे लोकार्पण
By admin | Updated: August 18, 2016 00:33 IST