लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूस कारणीभूत औषधीसह न वापरलेले इंजेक्शन व गोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहे. जप्त केलेले औषध व डाॅ. शीतल यांच्या विसेरातील नमुने जुळतात वा नाही हे तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठविले आहे. डाॅ. शीतल यांची आत्महत्याच असावी, या निष्कर्षापर्यंत तपास पोहचला असला तरी यासाठी अहवालाकडे पोलिसांचे लक्ष लागून आहे, अशी माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’ला दिली.
या शिवाय पोलिसांना काही महत्त्वपूर्ण धागेदोरे गवसले आहेत. त्याची पडताळणी केल्यानंतर पोलीस डाॅ. शीतल मृत्युबाबत खुलासा करतील, असे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. बुधवारी पोलिसांनी डाॅ. शीतल यांच्या मृत्यूदरम्यान तिच्या संपर्कात आलेले पती गौतम करजगी, सासू सुहासिनी करजगी व सासरे शिरीष करजगी यांच्यासह दोन नोकरांचे जबाब नोंदवले आहेत. यातून पोलिसांनी एकूणच घटनाक्रम समजून घेतला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांना डाॅ. शीतल यांच्या खोलीत एक औषध आढळले. हे औषध गुंगीचे असावे, अशी शक्यताही पोलीस सूत्राने वर्तविली आहे. हे औषध डाॅ. शीतलच्या विसेराच्या नमुन्याशी जुळते का, या औषधाची किती मात्रा शरीरात गेल्यास मृत्यू होऊ शकतो, किती वेळात मृत्यू होतो. याचाही शोध पोलीस घेत आहे. सुमारे २५ ते ३० गोळ्याही आढळल्या आहेत. ही बाबही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
बाॅक्स
मोबाईलमध्ये सुसाईड नोट असण्याची शक्यता
डाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली असेल तर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असती. परंतु आतापर्यंतच्या तपासात ती कुठेही आढळली नाही. जप्त केलेल्या मोबाईल, टॅब वा लॅपटाॅपमध्ये सुसाईड नोट असण्याची दाट शक्यता आहे. यातूनच मृत्यूमागील कारणांचाही उलगडा होईल, अशी आशा पोलिसांना आहे. डाॅ. शीतल यांनी पासवर्ड बदलल्यामुळे यातील डेटा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पासवर्ड काढण्यासाठी मोबाईल, टॅब व लॅपटाॅप मुंबईच्या सायबर सेलमधील तज्ज्ञांकडे पाठविला आहे. पासवर्ड काढताना कोणताही डेटा डिलीट होऊ नये, याची खबरदारी घेणाच्या सूचना सायबर सेलला दिल्याचे समजते. मुंबईतील सायबर सेलला हे शक्य न झाल्यास ते हैदराबादला पाठविण्याची पोलिसांची तयारी आहे.
आत्महत्येचा नेमका शोध घेण्याचे आव्हान
डाॅ. शीतल यांनी आत्महत्याच केली असावी, असे पोलिसांना एकूण तपासावरून दिसून येत आहे. ही बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट होईल, असे पोलिसांना वाटत आहे. ही बाब एकदा निष्पन्न झाल्यानंतर आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेणार आहेत. कौटुंबिक कलहातून आत्महत्या केली वा अन्य कारणाने या दिशेनेही पोलीस तपास करीत असल्याचे समजते.
तपासावर पोलीस अधीक्षकांचे बारीक लक्ष
डाॅ. शीतल आमटे ही मोठी व्यक्ती असल्याने या प्रकरणाकडे आनंदवनाशी जुळलेल्या प्रत्येक घटकाचे लक्ष लागलेले आहे. यामुळे तपासात कोणतीही उणीव राहू नये, याची खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे तपासावर बारीक लक्ष ठेवून आहेत. क्षणाक्षणाला तपासाबाबत माहिती घेत आहे.
कोट
डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूबाबतचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आत्महत्या असावी, असे एकूणच तपासावरून दिसून येत आहे. परंतु फाॅरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ही बाब स्पष्ट होईल. तपासातून एकही कळी सुटू नये, याची खबरदारी घेत आहोत. काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याचा सर्व बाजूने उलगडा झाल्यानंतरच खुलासा होणार आहे.
- अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.