हंसराज अहीर : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची लढाई जिंकण्याचा दिला विश्वासभद्रावती : ज्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या त्यांना अत्यल्प मोबदला देऊन फसवणूक करण्यात आली आहे. तर प्रकल्पामध्ये ज्यांना नोकरी मिळाली त्यांना आठ ते नऊ हजार रुपये वेतन देऊन बोळवण केली जात आहे. मात्र, आता शेतकऱ्यांनी लढा उभारण्याची गरज असून कामगार नाही तर आता मालक होण्याची वेळ आली आहे, शेतकऱ्यांनी संघटीत व्हावे असे आवाहन केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले. भद्रावती येथील विश्रामगृहात कर्नाटका एम्टा कोळसा कंपनी, सेंट्रल कॉलरीज कंपनी, सनफ्लॅग कंपनी या तिन्ही कंपन्यांच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आज रविवारी पार पडली. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले. भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण व सेंट्रल कॉलरीज कंपनी तसेच वरोरा तालुक्यातील सनफ्लॅग कंपनी या तिन्ही कंपन्यांची लिज रद्द करण्यात आली आहे. या तिन्ही कंपन्या सरकार जमा झाल्या आहेत. येत्या मार्चपर्यंत त्यांना कोळसा काढण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांना दिली आहे. त्यानंतर या तिन्ही खाणी कोल इंडियाने आपल्या ताब्यात घ्याव्या व कोल इंडियाच्या नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकरी व शेतीचा भाव देण्यात यावा, असे ते म्हणाले. यासाठी आता प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारणे आवश्यक असून ही लढाई आपणच जिंकणार असल्याचाही विश्वास ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. खासगी कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती ‘ना नोकरी ना शेतीला भाव’ अशी झाली होती. परंतु या तिन्ही कंपन्या कोल इंडियाने घेतल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन एकर जमिनीसाठी नोकरी, आठ ते दहा लक्ष रुपये प्रति एकर भाव, नोकरी नाकारल्यास पाच लाख प्रमाणे मोबदला या खाणींसाठी लागू झाल्या पाहिजे. आता आपल्या मागण्यांचे रुप आधी पेक्षा बदलले आहे, असेही ना. अहीर म्हणाले.लुटारुंच्या विरोधात हा लढा आहे. खासगी कंपन्याद्वारे लुटल्या गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लुटारुंच्या पाशातून काढायचे आहे. प्रकल्पग्रस्तांनी या कंपन्यांकडून घेतलेली रक्कम परत देण्याची मानसिकता ठेवावी त्यानंतरच हा लढा लढू शकू. आता कोणालाही काही मागायचे नाही. कामगार नाही आता, मालक व्हा. खुप पिळवणूक झाली. आता दुसरा मार्ग पकडायचा आहे, असे ते म्हणाले.या बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, खुशाल बोंडे, जि.प.बांधकाम सभापती देवराव भोंगळे, रवी नागपुरे, जि.प. सदस्य विजय वानखेडे, राहुल सराफ, नरेंद्र जीवतोडे, ओम मांंडवकर, संजय पारखी, गोपाल गोसवाडे, नामदेव डाहुले, वसंत सातभाई उपस्थित होते. बैठकीनंतर तहसीलदार, वेकोलि अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्याबाबत ना. अहीर यांनी चर्चा केली. कार्यक्रमाचे संचालन विजय वानखेडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
कामगार नाही, आता मालक व्हा!
By admin | Updated: November 30, 2014 23:00 IST