चंद्रपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम. जाधव, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुर्यकांत खनके, अंनिसच्या ऊर्जानगर शाखेचे मार्गदर्शक तेलंग आदींची उपस्थिती होती. यावेळी जाधव यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावरील गित सादर करून प्रबोधनास सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या जादुटोणा विरोधी कायद्यामध्ये समाविष्ट असलेल्या १२ कलामांबाबत चित्रमय पोस्टरच्या सहाय्याने माहिती दिली. जिल्ह्यामध्ये जादूटोणा, करणी केल्याचा आरोप करुन बोकापूर व राळापेठ येथील निरपराध व्यक्तींना अमानूष मारहाण करण्यात आली. याच आरोपखाली झालेल्या मारहाणीत बामणी (दुधोली) ग्रामपंचायत हद्दीतील अतिमनगर येथील एका निरपराध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनेबद्दलही याप्रसंगी माहिती देण्यात आली.जादूटोणा भूत- भानामती करणी, दैवी चमत्कार, नरबळी दिल्याने गुप्तधन मिळणे, मंत्राने विषारी सापाचे विष उरतविणे हे सर्व थोतांड आहे. ढोगी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी समाजामध्ये पेरलेल्या या केवळ अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका, गेल्या दहा वर्षांपासून याबाबतीत चमत्कार घडवा २१ लाख रुपयाचे बक्षिस मिळवा असे महाराष्ट्र अंनिसने केलेले आव्हान आजपर्यंत कोणीच स्विकारलेले नाही. अशी माहिती याप्रसंगी जाधव यांनी दिली. ढोंगी लोक तथाकथीत चमत्कार दाखवून लोकांना कसे लुबाडतात तशाच प्रकारच्या काही चमत्कारिक प्रयोगाचे सादरीकरण करून त्यामागील वैज्ञानिक कारण जाधव यांनी स्पष्ट करून सांगितला. सर्पविज्ञान प्रबोधन सप्ताहानिमित्त सर्पविज्ञानाबद्दलही जाधव यांनी याप्रसंगी माहिती दिली. प्राचार्य सुर्यकांत खनके यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. सायबर सेलच्या (क्राइम ब्राँच) सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी हुमणे यांच्या हस्ते पाण्याचे पेटणाऱ्या चमत्कारिक दिव्याचे प्रज्वलन करून प्रबोधन कार्यक्रम सुरू करण्यात आला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सर्पविज्ञान पोस्टर प्रदर्शनी व जादुटोणा विरोधी कायदा सचित्र पोस्टर प्रदर्शनीच्या जिल्ह्यातील ४०० च्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. सायबर सेलचे पोलीस नाईक मूजावर अली यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रास्ताविक दूरेंद्र गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण चव्हाण, लिना चिमूरकर, बळवंत ठाकरे, किसन अरदळे, सर्पमित्र केशव कुळमेथे, मोनू खोब्रागडे, प्रणय मगरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. आभार गेडाम यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अंंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन
By admin | Updated: August 3, 2014 23:18 IST