लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए इतिहासात पहिल्यांदाच शून्यावर आला आहे. १० वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी एनपीए ५.७५ टक्क्यांवर आला होता. बँकेच्या नफ्यातही ७५.८९ कोटींपर्यंत वाढ झालेली आहे. यामध्ये निव्वळ नफा ३.३९ कोटींहून तब्बल १६.५६ कोटींवर पोहोचला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिली. बँकेचा एनपीए शून्य टक्के आल्यामुळे बँकेच्या भागधारकांना बँक पहिल्यांदाच लाभांश देण्याची कार्यवाही करीत असल्याचेही रावत म्हणाले. बँकेला स्पर्धेच्या युगात टिकण्याकरिता डिजिटल बँकिंग व्यवसाय करण्याच्या उद्देशाने नेट बँकिंगद्वारे आर्थिक व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही रावत यांनी सांगितले. सन २०१९-२० मध्ये बँकेचा सकल एनपीए २७.५६ टक्के होता; २०२०-२१ मध्ये तो १३७१ टक्के झाला. मार्च २०२२ मध्ये तो ७.८९ टक्क्यांवर आला. मागील १० वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी निव्वळ एनपीए ५.७५ टक्के होता. तो आता मार्च २०२२ अखेर शून्यावर आला आहे. यासोबतच ३१ मार्च २०२० अखेर बँकेचा ढोबळ नफा ४४.४४ लाख असताना निव्वळ नफा फक्त ०.४१ टक्के होता. मार्च २०२१ अखेर ढोबळ नफा ६०.३५ कोटी होता; तर निव्वळ नफा ३.३९ टक्के होता. ३१ मार्च २०२२ मध्ये बँकेच्या नफ्याचे उद्दिष्ट ७२ कोटींचे ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ७५.८९ कोटींचा ढोबळ नफा झाला तर निव्वळ नफा १६.५६ कोटींवर गेला आहे. मागील वर्षी बँकेची ऑपरेट काॅस्ट ९१.१७ कोटी होती. मार्च २०२२ अखेर ती ८५.६४ कोटी असून ६.५३ कोटींनी ती कमी झाली आहे. बँकेचे नक्त मूल्य शून्यापेक्षा कमी असायला नको. चालून वर्षात नक्त मूल्य २२३.६४ कोटी आहे. बँकेच्या भाग भांडवलात ८.९७ कोटींनी वाढ झालेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतही ३९.२५ कोटींनी वाढ झालेली आहे. पीक कर्जवाटपाची पूर्तता ११० टक्के केली आहे. तसेच दुर्धर आजाराकरिता ३१४ शेतकऱ्यांना ६४.७२ लाखांचा मदत निधी वाटप करण्यात आला आहे, असेही जिल्हा बँक अध्यक्ष रावत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, संचालक रवींद्र शिंदे, शेखर धोटे, संदीप गड्डमवार, विजय देवतळे, संजय तोटावार, ललित मोटघरे, उल्हास करपे, प्रकाश बन्सोड, पांडुरंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर उपस्थित होते.