ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील धान या मुख्य पिकाची २९ हजार ४६ हेक्टर. क्षेत्रावर रोवणी झालेली आहे. सदर पिकाच्या वाढीसाठी तालुक्यात युरिया खताची लक्षात घेता जिल्हा परिषद कृषी विभागाच्या विशेष प्रयत्नाने ब्रह्मपुरी तालुक्यात चार हजार २८० बॅग (२१४ मेट्रिक टन) युरिया नुकताच प्राप्त झाला आहे. सदर खत तालुक्यातील पेरणी झालेल्या क्षेत्रानुसार तालुक्यातील विविध कृषी केंद्र व सहकारी सोसायटीकडे शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. ब्रह्मपुरी- १०४ मेट्रिक टन (२२८ बॅग) मेंडकी- १७ मेट्रिक टन. (३४० बॅग), आवळगाव - २० मेट्रिक टन (४०० बॅग), गांगलवाडी - १३ मेट्रिक टन (२६० बॅग), साचलगाव - ६ मेट्रिक टन (१२० बॅग), अऱ्हेरनवरगाव १५ मेट्रिक टन (३०० बॅग), दिघोरी- ९ मेट्रिक टन (१८०बॅग), पिंपळगाव- १० मेट्रिक टन (२०० बॅग), तोरगाव २.५ मेट्रिक टन. (५० बॅग) मालडोंगरी २.५ मेट्रिक टन (५० बॅग) या प्रमाणे तालुक्यामध्ये साठा वितरीत करण्यात आला आहे. युरिया खत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या प्रत्येक निविष्ठा केंद्रावर पंचायत समितीच्या कृषी विभागातील कर्मचारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या देखरेखीमध्ये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येत आहे. त्यामुळे साठेबाजी, युरिया खताची ज्यादा भावाने विक्री, युरिया खतासोबत इतर खतांची लिंकीग करणे या प्रकाराला प्रतिबंध बसलेला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पुन्हा २०० मेट्रिक टन (४००० बॅग) युरिया ब्रह्मपुरी तालुक्याला उपलब्ध होणार असून त्यामुळे मुबलक प्रमाणात युरिया खताची उपलब्धता तालुक्यात होणार आहे. खताची ज्यादा दराने विक्री साठेबाजी, किंवा लिकींगसारखे प्रकार तालुक्यात आढळून आल्यास त्याची त्वरीत पंचायत समितीच्या कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांना माहिती देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी तालुक्यात युरिया खताचे वितरण
By admin | Updated: September 27, 2014 01:28 IST