शेतकऱ्यांना दिलासा : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शनघोडपेठ : कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे पीक असले तरी निसर्गाची साथ मिळत नसल्याने सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड करावी, यासाठी मंगळवारी घोडपेठ येथील शेतकऱ्यांना स्थानिक किसान भवन येथे शासनातर्फे महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांची हंगामपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. मागील दोन तीन वर्षांपासून सततची नापिकी व दुष्काळामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्यात सापडला आहे. यंदाही पावसाची आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस हुलकावणी देत आहे. मागील आठवड्यात आलेल्या काही तासांच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजावर भरवसा ठेवून परिसरातील काही शेतकऱ्यांनी पेरणीसुध्दा केली. मात्र पाऊस अद्यापही बरसला नसल्याने परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.मागील तीन वर्षांच्या कालावधीत घोडपेठ व परिसरातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाने चांगलाच फटका दिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे पाठ फिरवल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. सोयाबीन हे अल्प खर्चाचे पीक आहे. बियाणे वाटप कार्यक्रमाला भद्रावतीचे कृषी पर्यवेक्षक यु.बी. झाडे तसेच घोडपेठ येथील कृषी सहाय्यक बी. एस. विजापूरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाण्यांच्या लागवडी बद्दल मार्गदर्शन केले. तसेच महाबीजच्या इतर बियाण्यांबद्दलही उपस्थितांना माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना माफक दरात बियाणे उपलब्ध झाल्यामुळे काही प्रमाणात तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी घोडपेठ येथील उपसरपंच विनोद घुगूल यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
घोडपेठ येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप
By admin | Updated: June 24, 2016 01:34 IST