बल्लारपूर पालिकेचा उपक्रम : टोल फ्री नंबर आणि व्हॉटस्अॅप सुविधाबल्लारपूर: स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत बल्लारपूर शहर स्वच्छ आणि सुंदर तद्वतच रोगमुक्त होण्याकरिता नगर परिषदेकडून स्वच्छता अभियान चालविला जात आहे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती आणि या अभियनात त्यांचा सहभाग यावर भर देऊन तसे कार्यक्रम न.प.ने आयोजित केले आहेत.याचा प्रारंभ स्थानिक म. गांधी पुतळ्याजवळ शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात, स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषदेकडून नागरिकांना अनुदानित वैयक्तीक घरगुती शौचालयाचे एकूण २१४ जणांना मंजुरी आदेशपत्र वाटपाने झाला. या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी नगराध्यक्षा छाया मडावी या होत्या. मुख्याधिकारीी विपीन मुद्धा, विरोधी पक्ष नेते चंदन सिंह चंदेल, गटनेता देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, दिलीप माकोडे, नगरसेवक डॉ. सुनिल कुल्दीवार, विकास दुपारे, येलय्या दासरप, माजी नगरसेवक नरसिंग रेब्बावार, प्रभाकर मुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाची अधिक जवळीक व्हावी, तक्रारी व सूचना प्रशासनाकडे त्वरित येऊन त्यांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, या उद्देशाने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग न.प.ने करण्याचे ठरविले आहे. टोल फ्री नंबरवर आता नागरिकांना तक्रारी तसेच सूचना करता येतील. तद्वत, व्हॉटस्अॅप सेवाही सुरू झाली आहे. या सुविधाजनक तंत्राचे उद्घाटन या कार्यक्रमात करण्यात आले. स्वच्छतेचे महत्व, त्याकरिता नगर परिषदेकडून चालविले जात असलेले काम, आणि जनतेचा सर्वतोपरी अपेक्षित सहभाग याबाबत नगराध्यक्षा मडावी, चंदेल, मुलचंदानी, दुपारे, मुख्याधिकारी मुद्धा यांची भाषणे झालीत. प्रास्ताविक मुख्याधिकारी विपीन मुद्धा, संचालन कार्यालय अधीक्षक विजय जांभुळकर आणि आभार प्रदर्शन शब्बीर अली यांनी केले. तत्पूर्वी, म. गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला वाहून सर्वांनी स्वच्छता राखण्याबाबत शपथ घेतली. नगर परिषद कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या सर्वांनी हातात झाडू घेऊन ग्रामीण रुग्णालय, रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय, न.प. कार्यालय हा भाग स्वच्छ केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विजय जांभुळकर, संकेत नंदवंशी, सतीश गोगुलवार, हंसाराणी आर्य, शब्बीर अली, जितेंद्रम चवरे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
स्वच्छता अभियानात २१४ जणांना घरगुती शौचालय मंजुरीपत्र वितरित
By admin | Updated: October 7, 2015 02:05 IST