३७.६५ लक्ष रूपयांचे अनुदान : ५२ लाभार्थ्यांना वितरणचंद्रपूर : विविध कारणास्तव शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास अशा प्रकरणी शासनाच्यावतीने मदत म्हणून अनुदान देण्यात येते. यासाठी असलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत ५२ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मदतीचे वितरण करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या सभागृहात मदत वाटपाचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, सभापती देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंह, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, शिक्षणाधिकारी राम गारकर आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ५२ विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना ३७ लक्ष ६५ हजार रूपयाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. विविध प्रसंगी विद्यार्थ्यांना अपघातास बळी पडावे लागते. अशावेळी कुटुंबियास मदतीचा हात विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत दिला जातो. आजच्या मदत वाटपामध्ये अपघातात मृत पावलेल्या ४९ तर अपंगत्व आलेल्या तीन अशा ५२ प्रकरणी मदतीचे वितरण करण्यात आले. अपघातात शारीरिक आपत्ती कोसळलेल्या विद्यार्थ्यांप्रती शासनाचे मदतीचे धोरण असून अशा प्रत्येक प्रकरणी पुढेही मदत वाटप केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी गारकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थी अपघात योजनेच्या मदतीचे वितरण
By admin | Updated: August 9, 2016 00:46 IST