पळसगांव (पि) : मदनापूर येथील ग्रामपंचायतीतर्फे गावातील तरुणांना पुस्तकांच्या संचाचे मोफत वाटप करण्यात आले.
आपल्या छोटेखानी मनोगतात ग्रामसेवक केशव गजभे यांनी तरुणांना व्यसन नाही तर वाचन करावे, हा संदेश दिला. गावातील सार्वजनिक वाचनालयाकरिता आज स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची कमतरता लक्षात घेता मदनापूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त असलेले पुस्तक संच भेट देण्यात आले. दिलेल्या पुस्तक संचाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. गावातील सर्वच तरुण आजच्या स्पर्धेच्या युगात टिकाव धरतील, हाच उद्देश मनात बाळगावा. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून गावाचे नावलौकीक करावे, असेही गजभे म्हणाले. यावेळी माजी सदस्य मोरेश्वर डुमरे, रोजगार सेवक किशोर मगरे, शिपाई नागेश्वर रंदये, ज्ञानेश्वर श्रीरामे आणि विद्यार्थी उपस्थित होते.