वरोरा : ७५ वरोरा विधानसभा अंतर्गत येत असलेल्या धानोली गावात मागील कित्येक निवडणुकीचे मतदान केंद्र गावातच होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धानोली गावात मतदान केंद्र दिले नाही. त्या ऐवजी वाघेडा येथे मतदान केंद्र देण्यात आल्याने धानोली वासियांनी लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला होता. आता १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्र धानोलीऐवजी वाघेडा येथेच ठेवण्यात आल्याचे आज गुरुवारी मतदान केंद्र पाहणीतून आढळून आले आहे. त्यामुळे धानोली येथील मतदार तुर्तास संभ्रमात सापडले आहेत.७५ वरोरा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील धानोली गावातील जि.प. शाळेत मतदान केंद्र मागील कित्येक वर्षापासून आहे. धानोली गावातील मतदारांची संख्या ९५० असून मतदान केंद्र क्र. १८० आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या चिठ्ठ्यावर मतदान केंद्र धानोली दर्शविण्यात आले होते. परंतु निवडणुकीकरिता नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याजवळ धानोली नजीकच्या वाघेडा (सालोटी) या गावी मतदान केंद्र असल्याचे आदेशात नमूद करण्यात आल्याने धानोलीवासीयांनी धानोली गावातच लोकसभेचे मतदान केंद्र देण्यात यावे, अशी मागणी करीत निवेदन प्रशासनास व निवडणूक आयोगास दिले होते. मतदानाच्या दिवसापर्यंत मतदान केंद्र धानोलीमध्ये बदलविण्यात आले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत धानोलीवासीयांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. निवडणूक विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी धानोली येथील मतदारांनी समजूत घातल्यानंतरही बहिष्कार कायम ठेवला होता. येत्या विधानसभा निवडणुकीत वाघेडाऐवजी धानोली गावात मतदान केंद्र देण्याचे आश्वासन देण्यात आले. आज मतदान केंद्राची पाहणी करण्याकरिता अधिकारी आले असता त्यांनी वाघेडा येथील मतदान केंद्राची पाहणी केल्याने वाघेडा येथील मतदान केंद्र कायम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धानोलीवासीयांनी धानोली गावात मतदान केंद्र देण्यात यावे, याकरिता धावपळ चालू केल्याचे दिसून येत आहे. याबाबत भद्रावती तहसीलदार कुमावत यांच्याशी संपर्क साधला असता मतदान केंद्र बदलविण्याचा प्रस्ताव पाठविला होता. सुधारीत प्रस्ताव आजच निवडणूक विभाग मुंबईला घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
धानोलीचे मतदान केंद्र पुन्हा वाघेडालाच दिल्याने संभ्रम
By admin | Updated: October 9, 2014 23:00 IST