चंद्रपूर : ऊर्जानगर येथील ३३ केव्हीच्या वीजवाहिनीला कुऱ्हाड मारुन चोरण्याचा प्रयत्नाचा भंगारचोरट्याचा फटका चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीसह परिसरातील गावांंना बसला. रविवारी ६ जुलैला हा परिसर अंधारात बुडाला होता. मात्र महावितरण चंद्रपूर विभागाच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार आणि चमूने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पहाटे वीज पुरवठा सुरळीत केला. हे काम पहाटे सुरू केले असते तर आजचा रविवारही नागरिकांंना अंधारात घालवावा लागला असता. मात्र रात्रभर काम केल्यानेच नागरिकांना रविवार सुखाने घालविता आला.पाच आणि सहा जुलैच्या रात्री भंगार चोरट्यांनी महावितरणच्या उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीवर कुऱ्हाड मारुन ती चोरण्याचा प्रयत्न केला. वीजवाहिनीवर कुऱ्हाड मारल्याने पद्मापूर ओपनकास्ट चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीसह आसपासची गावे अंधारात बुडाली. दुर्गापूर पोलीस चौकीच्या मागील भागातच ३३ केव्ही वीजवाहिनी आहे. तेथेच हा प्रकार रात्री आठच्या सुमारास घडला. वीजवाहिनी चोरी करून नेण्याच्या उद्देशानेच भंंगार चोरट्यांनी हा प्रताप केला.या वीज वाहिनीवरुन पद्मापूर, दुर्गापूर, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र वसाहत, किटाळी, भटाळी यासह अन्य गावात वीजपुरवा केला जातो. मात्र भंगारचोरट्यांच्या प्रतापाने या गावात अंधार पसरला होता. वीजवाहिनी तोडल्यामुळे आगीचा भडका होऊन भंगारचोरटाही जखमी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. रात्रीच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले. रात्र असल्याने आणि उपलब्ध साधनांच्या अभावाने कर्मचाऱ्यांना दुरुस्तीच्या कामात अनंत अडचणी येत होत्या. कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वारही रात्री एकच्या सुमारास घटनास्थळावर दाखल झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी आणि चमूने रात्रभर काम केले. स्वत:च केबल जोडणीसाठी पुढाकार घेतला. कंत्राटदार, महावितरणचे कनिष्ठ अभियंते, लाईनमनच्या यांच्या मदतीमुळे वीजपुरवठा सुरळीत करता आला. दादू नावाच्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याने केबलजोडणी केली. (शहर प्रतिनिधी)
भंगार चोरट्यांमुळे वीजपुरवठा खंडित
By admin | Updated: July 7, 2014 23:29 IST