चंद्रपूर : मतदानासाठी येणाऱ्या वृद्ध, अंध, अपंग मतदारांना मतदान कक्षात त्रास न होता पोहचता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने सहाही विधानसभा क्षेत्रात आदर्श मतदान केंद्र घोषित केले. या केंद्रांवर सुविधा उपलब्ध करुन देऊन मतदारांचे स्वागत करायचे होते. मात्र, काही मतदान केंद्रावर सुविधाच नव्हत्या. त्यामुळे आदर्श मतदान केंद्राची संकल्पना धुळीस मिळाली. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी येथीलच जि. प. शाळा क्रमांक १ आदर्श मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, या केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या नव्हत्या. मतदान केंद्र रांगोळी, फूलांनी सजवून बॅड पथकाद्वारे मतदारांचे स्वागत करण्याचे प्रशासनाने नियोजन केले होते. मात्र, असे काहीही दिसून आले नाही. उलट आदर्श मतदान केंद्रावर दोन स्थानिक पदाधिकाऱ्यांत बाचाबाची झाली. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांची विचारणा केली असता, त्यांनी मात्र भौतिक सुविधा पुरविल्याचे सांगितले. वरोरा विधानसभा क्षेत्रात आनंदवन येथील जि. प. प्राथमिक शाळेत आदर्श मतदान केंद्र ठरविण्यात आले होते. या शाळेत ९९ व १०० असे दोन मतदान केंद्र होते. आनंदवन येथे १७ वर्षापासून राहत असलेल्या प्रभात साळुंखे या ५८ वर्षीय अपंग व्यक्तीने तीनचाकी सायकलवर थेट मतदान कक्षात जाऊन मतदान केले. आपल्यासारख्या अपंग व्यक्तीला कोणताही त्रास न घेता मतदानाचा हक्क बजावता आला, इतरांनही मतदान करुन राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा, अशी प्रतिक्रीया साळुंखे यांनी दिली. या मतदान केंद्रावर छावणी उभारुन पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकूम व मूल तालुक्यातील मारोडा येथील प्रत्येकी एक मतदान केंद्र आदर्श ठरले. (प्रतिनिधी)
आदर्श मतदान केंद्रांवर असुविधा
By admin | Updated: October 15, 2014 23:32 IST