घोसरी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र शिधापत्रिका व अंत्योदय योजनाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भारतीय क्रांतिकारक दिव्यांग संघटना पोंभुर्णाच्यावतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोंभुर्णा तालुक्यात शेकडो दिव्यांग बांधव वास्तव्य करीत आहेत. त्यांचे संयुक्त कुटुंबात राहणे आहे; परंतु राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा शासन निर्णयानुसार मात्र दिव्यांग स्वतंत्र शिधापत्रिका व अंत्योदय योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. यासाठी शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र शिधापत्रिका देण्यात यावी, तसेच दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा, यासाठी भारतीय क्रांतिकारक दिव्यांग संघटना पोंभुर्णाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष रफिक अहमद कुरेशी, उपाध्यक्ष नवनाथ पिपरे, सचिव अविशांत अलगमवार, गयाबाई भलवे, शारदा मोगरकर, देवीदास उराडे, अनिल सातपुते, संतोष सातपुते, अरुणा अल्लीवार, शुभम धोडरे, रामचंद्र गद्देकार, प्रफुल्ल धोडरे व असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.