उपक्रमाचे उद्घाटन : पेन देऊन विद्यार्थिनीचा सन्मान चंद्रपूर : जिल्ह्यात राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत लोकसहभागातून डिजिटल शाळा निर्माण करण्यात आला आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत ही शाळा पुढे घेऊन जाण्याकरिता गावकऱ्यांनी मदत केली आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने अध्यापन करणे शक्य होणार आहे. लोकसहभागातून एन्ड्राईड टीव्ही संच खरेदी करुन शाळेचे डिजिटलाझेशन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करुन सोप्या पध्दतीने शिकविण्यास मदत होते. खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांच्या हस्ते या डिजिटल शाळा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन डिजिटल शाळा उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना या उपक्रमापासून शैक्षणिक फायदा कसे होतात. याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करुन माहिती देण्यात आली. प्रत्येक्ष जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्गात येवुन विद्याथ्यार्शी संवाद साधत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले होते. एका विद्यार्थिनीला सिह यांनी स्वत:ची पेन देऊन सन्मानित केले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते, राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, सहायक गटविकास अधिकारी पानबुडे, स्वच्छ भारत मिशनचे आयईसी कृष्णकांत खानझोडे, साजीद निजामी, मुख्याध्यापक एन आर बोबाटे, सरपंच प्रतिभा करमनकर, उपसरपंच इर्शाद वहीद शेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उतरावे -एम. डी. सिंहउद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यकरी अधिकारी एम. डी. सिंह म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण होऊन चालणार नसून त्यांनी शिक्षणाची आवड व जिद्द निर्माण केली पाहिजे. शिक्षणाच्या स्पर्धेत उतरुन प्रत्येकाने प्रथम येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्पर्धेतूनच खरा शैक्षणिक विकास होत असतो, असेही सिंह म्हणाले.
लोकसहभागातून उभारली डिजिटल शाळा
By admin | Updated: February 19, 2017 00:32 IST