भदन्त नागघोष थेरो : ५८ वा अनुप्रवर्तन सोहळा थाटातचंद्रपूर : बौद्ध धम्म हा जगातील सर्वात मोठा धम्म आहे. तो धर्म नसून एक सामाजिक सिद्धांत आहे. हा धम्म निखळ सहजसत्य आहे. मानव व निसर्गाचे संबंधसूत्र आहे. म्हणूनच जगातील बहुतेक राष्ट्राने बुद्धाचे तत्वज्ञान आत्मसात केले आहे, असे मत भदन्त नागघोष थेरो यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.५८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यातील दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक बुद्धवंदनेने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त आर्य नागार्जून शुरेई ससाई होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, भदन्त नागवंशा कनान, भदन्त नागाप्रकाश, भदन्त नागादिप, भदन्त धम्मबोधी, भदन्त नागवंशा, नागपूर तसेच बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, सचिव वामन मोडक, सदस्य राकेश गेडाम, सी.के. मेश्राम, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी हेमंत शेंडे यांच्या चमूने स्फुर्तीगीत सादर करुन वातावरण धम्ममय केले. भदन्त नागवंश म्हणाले, बुद्धाचा धम्म केवळ श्रवण न करता तो आचरणात आणला तर, धम्मचळवळ अधिक गतीमान होईल, असे सांगितले. समारंभाचे अध्यक्ष सुरेई ससाई यांनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांचा धम्म जगात गतिमान केला, आपणही धम्माचा प्रसार करावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. (स्थानिका प्रतिनिधी)
धम्म निखळ सहजसत्य आहे
By admin | Updated: October 16, 2014 23:21 IST