सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर, गडचिरोली व नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांना गॅस देणारचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या निर्णयाप्रमाणे सन २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सुध्दा उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार महाराष्ट्र सरकारने घेतला असल्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजनेमधून आतापर्यंत देशातील दोन कोटी गरीब, किसान व मजूर नागरिकांना १०० टक्के सुटीवर गॅसचे वितरण करण्यात आल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. याच योजनेमधून महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली व नंदूरबार जिल्ह्यातील सर्व समाजाच्या नागरिकांनाही गॅस देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.केंद्र शासनाच्या तीनवर्षे पूर्तीनिमित्त बल्लारपूर येथे वेस्टर्न कोल फिल्ड लि.च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार अॅड. संजय धोटे, नगराध्यक्ष हरीष शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, पोंभूर्णा नगरपंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सभापती अल्लका आत्राम, वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासिंग व खुशाल बोंडे उपस्थित होते. केंद्र शासनाने सर्वांचा विकास साधण्यासाठी तीन वर्षात विविध योजना मंजूर केल्या असून त्या योजनाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांचे धोरण असल्यानेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांना न्याय देण्याचा संकल्प करीत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. ना. हंसराज अहीर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व भागात व सर्व क्षेत्रात लक्ष ठेवून असून त्यांनी संपूर्ण देशाचा विकास साधण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, स्कील इंडिया, सिंचन योजना, अमृत योजना, देशाची उत्पादकता वाढविण्यासाठी मेक इन इंडिया इत्यादी प्रकारच्या अनेक विविध लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आनंदवन येथील दिव्यांग कलाकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी गीते व नृत्याचे प्रदर्शन केले. यावेळी उज्वला गॅस योजनेतून गॅस कनेक्शनचे वितरणही करण्यात आले. तसेच ज्या नागरिकांनी गॅसची सबसिडी सोडली अशा व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार
By admin | Updated: June 21, 2017 00:43 IST