स्वच्छता करण्याची मागणी
घुग्घुस : घुग्घुस शहरात अनेक ठिकाणी कचराकुंडी नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नाही. अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड व मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतर्फे कुत्रे पकडण्यासाठी पथक आहे. मात्र कागदोपत्रीच नोंद केली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
बांधकाम साहित्याने अपघात वाढ
चंद्रपूर : शहरातील बहुतांश वाॅर्डात घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
रिक्त पदे भरण्याची मागणी
जिवती : तहसील कार्यालयातील विविध पदे रिक्त आहे. परिणामी नागरिकांना अनेक कामाकरिता खेटे मारावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. रिक्त पदांमुळे अनेकदा नागरिकांची कामे करण्यास विलंब होत आहे. प्रशासनाने दखल घेऊन रिक्त पदे भरावी, अशी मागणी केली जात आहे.