तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
कोरपना : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची कित्येक वर्षे लोटूनही अवस्था ‘जैसे थे’ आहे. या रस्त्याचे भाग्य उजळणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. सावलहिरा, येन्सापूर, कारगाव, जिवती, पिपरी, नारंडा बाखर्डी, नांदा, इरई कवठाळा आवारपूर, विरूर, लोणी, नारंडा आदी गावाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
रेडियम पट्ट्या लावाव्या
राजुरा : आदिलाबाद मार्गावर अंतर फलक व झाडावर रेडियम पट्ट्या लावण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. राज्य सीमेवरील राज्य सीमा फलक सुस्थितीत करून सीमेचे सौंदर्यीकरण करणे आवश्यक असल्याचे मत वाहतूकदाराकडून व्यक्त होत आहे. असे झाल्यास या मार्गावरील अपघाताच्या संख्येत घट येईल.
व्यायाम शाळा उभारण्याची मागणी
कोरपना : तालुक्यातील काही गावात व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कोरपना तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत; मात्र अजूनही काही गावांत व्यायाम शाळा नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहेत; मात्र भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.