चौकशीची मागणी : हंसराज अहीर यांचा आरोपचंद्रपूर : जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची साथ असताना या गंभीर प्रकाराकडे जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकार्यांनी विशेषत: जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुर्लक्ष केल्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या रुग्णांवर प्रभावी व वेळेवर उपचार न झाल्याने गोंडपिंपरी तालुक्यातील चार ते पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली. त्यामुळे या घटनेस जबाबदार असणार्या आरोग्य अधिकार्यांवर दोषारोप ठेवून कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार हंसराज अहीर यांनी केली आहे. डेंग्यूची मोठय़ा प्रमाणात लागण झालेल्या गोंडपिंपरी तालुक्यातील राळापेठ या गावास ३ जून रोजी भेट देऊन खासदार अहीर यांनी डेंग्यू प्रभावित रुग्णांची भेट घेऊन त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची चौकशी केली. यावेळी खासदार अहीर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांच्या अक्षम्य व बेजबाबदार भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करून आरोग्य खात्याच्या अधिकार्यांनी डेंग्यू व तापाच्या अन्य साथीची त्वरीत दखल घेऊन आरोग्य सुविधा वेळीच उपलब्ध करून दिल्या असत्या तर रुग्णांच्या संख्येत वृद्धी झाली नसती व काही रुग्णांना जीव गमवावा लागला नसता. या सार्या प्रकाराला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीसुद्धा तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.गोंडपिंपरी तालुक्यात अनेक गावात डेंग्यूची साथ असतानाही स्थानिक उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने या गावात वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी विलंब झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राळापेठ येथे डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जे रुग्ण खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले ते दगावल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. जे रुग्ण दगावले ते कोणत्या खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करण्यात आले. या उपचारापोटी या रुग्णांकडून किती बिल आकारण्यात आले व दगावलेले रुग्ण नेमके कोण होते, या सर्व बाबींची चौकशी जिल्हा आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकार्यांनी जबाबदारीने करावी, अशी मागणीही खा. अहीर यांनी केली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील धामणगाव येथे डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू असून या ठिकाणी तातडीने आरोग्य शिबिराची व्यवस्था करून रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करावे, अशा सूचनाही खा. अहीर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. या भेटीप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप करपे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
डेंग्यू पसरविण्यास विभागच जबाबदार
By admin | Updated: June 5, 2014 23:55 IST