मागील अनेक दिवसांपासून नांदा गावामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच दोन नागरिकांना जीव गमवावा लागला, आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत, असे वृत्त वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाल्याने उशिरा का होईना आज आरोग्य पथकाच्या चमूने नांदा येथे भेट दिली. डेंग्यूच्या उद्रेक ग्रस्त भागात केलेल्या पाहणीत डेंग्यू डासांच्या उत्पत्ती करणाऱ्या अळ्या अनेकांच्या घरी दिसून आल्यात. त्यामुळे स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाच्या टीमने मार्गदर्शन करून डेंग्यू डासांची उत्पत्ती होणार नाही, याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याचे तातडीने निर्देश दिले आहेत. स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन काटेकोरपणे कोरडा दिवस पाळावा, प्रत्येक घराची धूर फवारणी करावी, परिसरातील स्वच्छता करून कूलरच्या टाक्या, पाणी साठविण्याचे टाके, भांडी, उघड्यावर पडलेले टायर, पाणी साचलेले डबके रिकामे करावे, दर मंगळवारी कोरडा दिवस पाळावा, याकरिता ग्रामपंचायतीने मुनादी द्यावी. सोबतच नागरिकांनी मच्छरदाणी, मॉस्किटो कॉइल, अगरबत्ती यांचा वापर करीत डासांपासून स्वत:चे रक्षण करून डेंग्यूपासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.
210721\179-img-20210721-wa0021.jpg
नांदा येथे आरोग्य पथकाने दिलेली भेट