ब्रह्मपुरी : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जनमंच व गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समिती यांच्यावतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.देशभरात सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भात तर शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे. सगळ्यांना अन्न धान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येसारखी वेळ येत आहे. यातून शेतकऱ्यांची सुटका कशी होईल, यासाठी तत्कालिन केंद्र सरकारने १८ नोव्हेंबर २००४ ला स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने ४ आॅक्टोबर २००६ ला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. मात्र सरकारने आयोगाच्या शिफारशीकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. तसेच शिवाजी चौकात दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अॅड. गोविंद भेंडारकर, अशोक रामटेके, नामदेव ठाकूर, ऋषीजी राऊत, दादा पारधी, नीळकंठ मैंंद, मंगेश ठाकूर, गिरीधर गुरपुडे यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी येथे धरणे आंदोलन
By admin | Updated: November 2, 2015 00:56 IST