चंद्रपूर : कम्प्लेशन सर्टिफिकेटची परिपूर्तता न करणाऱ्या फ्लॅट स्कीमच्या विक्रीची निबंधक कार्यालयात होणारी रजिस्ट्री प्रतिबंधीत करण्याची मागणी जाणता राजा संघटनेने केली आहे.कोणत्याही इमारत बांधकामास महाराष्ट्र नगर रचना अधिनियमातील तरतुदीनुसार नगर पालिकेच्या हद्दीत नगर पालिकेची तर इतर ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हा नगर रचना विभागाच्या मंजुरीची आवश्यकता असते. या मंजुरीशिवाय किंवा मंजुर आराखड्याच्या व्यतिरिक्त बांधकाम करण्यात आल्यास ते बेकायदेशिर ठरते. त्यामुळेच या मंजुरी सोबतच इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार त्या इमारतीचे ‘कम्पलेशन प्रमाणपत्रदेखील संबंधित यंत्रणेकडून घेणे आवश्यक केले आहे. हे प्रमाणपत्र देताना संबंधित इमारतीचे बांधकाम मंजूर आराखड्यानुसार झाले किंवा नाही याची खात्री करून घेतली जाते.फ्लॅट स्कीमबाबत तर या प्रमाणपत्राशिवाय बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांना फ्लॅटची विक्री करणे ही गंभीर बेकायदेशिर बाब आहे. असे असले तरी जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या फ्लॅट स्कीममधील फ्लॅटच्या विक्रीची रजिस्ट्री ही नोंदणी निबंधकाकडून केवळ इमारतीचा आराखडा मंजूर आहे किंवा नाही एवढेच तपासून करण्यात येत आहे. इमारतीच्या अशा कम्प्लेशन प्रमाणपत्राच्या तपासणी शिवायच फ्लॅटच्या विक्री व्यवहाराची नोंदणी करून देण्याची सुविधा नोंदणी निबंधक कार्यालयाकडून उपलब्ध असल्यामुळेच बांधकाम व्यावसायिकांना बेकायदेशिर बांधकाम निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील बहुतांश बांधकाम व्यावसायिक नकाशा मंजूर करून फ्लॅट स्कीम जरी सुरू करीत असले तरी बांधकाम मंजूर आराखड्यानुसार करताना मात्र आढळत नाही. चंद्रपूर महानगरपालिकेने बेकायदेशिर बांधकामावरील मालमत्ता कर दुप्पट वाढविल्यामुळे याबाबीचा विनाकारण आर्थिक भुर्दंड ग्राहकांना दरवर्षी आणि कायमस्वरूपी भोगण्याची वेळ आली आहे. ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक होवू नये यासाठी या विरुद्ध कडक उपाय योजना करण्यासाठी बल्लारपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांंनी नोंदणी निबंधकांना पत्र जारी करून ‘कम्प्लेशन सर्टिफिकेट’ सादर न करणाऱ्या फ्लॅट स्कीममधील कोणत्याही फ्लॅटच्या विक्रीची नोंदणी करून देवू नये, अशा कडक सुचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा नोंदणी निबंधकांना योग्य ते आदेश जारी करावेत, अशी मागणी जाणता राजा संघटनेचे नितीन उदार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
बेकायदेशीर फ्लॅट स्कीमच्या विक्रीची नोंदणी प्रतिबंधित करण्याची मागणी
By admin | Updated: March 15, 2015 00:58 IST