चंद्रपूर : दिवाळी म्हटली की फटाक्यांच्या आतषबाजीसोबत मिठाईचीही धूम असते. एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा देण्याची पध्दत आहे. मिष्ठान्न बनविणाऱ्या व्यावसायिकांना दुधाची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. त्यासाठी ग्रामीण भागातील दुधाची जास्त प्रमाणात मागणी केली जाते. त्यामुळे दूध विक्रेत्यांना सध्या सुगीचे दिवस आलेले दिसत आहे. दसरा हा सण झाल्यानंतर कोजागिरीला सुरूवात होत असते. अनेक समाज बांधवातर्फे कोजागिरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी कोजागिरी पोर्णिमेपासून कोजागिरी उत्सवाला सुरुवात झाली. कोजागिरी उत्सव दिवाळीपर्यंत साजरा करण्यात येतो. रात्रीच्या वेळी दूध आटवून कोजागिरी उत्सव साजरा करतात. त्यामुळे अशावेळी दुधाची अत्यंत आवश्यकता असते. त्यासाठी अगोदरच दूध विक्रेत्यांकडून दुधाची मागणी केली जाते तर काही ठिकाणी दुधामध्ये विक्रेत्याकडून पाण्याची व अन्य पदार्थाची भेसळ केली जाते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. आता दिवाळीचा सण जवळच आला असून त्यासाठी मिठाईची मोठी मागणी राहणार आहे. प्रत्यक्ष दूध उत्पादनापेक्षा पुरवठा जास्त असल्याने गेल्या काही वर्षात दूध व मिठाईमध्ये काही व्यापाऱ्यांकडून अधिक लाभासाठी भेसळ केली जात असल्याचे उघडकीस आले होते. दोन वर्षापूर्वी नागरिकांच्या तक्रारीनंतर भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्यांवर कारवाई केली होती. तसेच अधूनमधून दूध संकलन केंद्र व दूध विक्रेत्यांवर कारवाई झाली होती. मात्र कडक कारवाई न झाल्याने भेसळयुक्त मिठाई व दूधविक्री पुन्हा सुरू झाल्याचा शहरात चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात मिठाई विक्रेते ग्राहकांची गर्दी पाहून त्या मिठाईमध्ये भेसळ करीत असतात. त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीवाला धोका होण्याची शक्यता निर्माण होते. आता सर्वांच्या आवडीची दिवाळी तोंडावर आली आहे. दोन दिवसानंतर दिवाळीला प्रारंभ होत आहे.दिवाळीला फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. याशिवाय दिवाळीच्या दिवसात एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे आपसुकच मिठाईला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एकापेक्षा एक सरस पेढे, बरफी, काजूकटली, लाडू, मोतिचूरचे लाडू, बालुशाही आदी अनेक प्रकारच्या मिठाईने बाजारपेठ सजली आहे. या मिठाई बनविण्याकरिता दुधाची गरजे भासते. त्यामुळे सध्या अशा व्यावसायिकांकडून दुधाची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने भावही गगनाला भिडले आहे. (शहर प्रतिनिधी)
दुधाची मागणी वाढली
By admin | Updated: October 18, 2014 23:22 IST