चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने वाढीव मालमत्ता कर पूर्ववत करण्याची मागणी शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांनी केली आहे.चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत अन्यायकारक अशी करवाढ कोणत्याही प्रकारची सुचना न देता सामान्य नागरिकांवर लादण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या झोन क्रमांक एकमधील नागरिकांना वाढीव कराबाबतची नोटीस बजावण्यात आली होती.चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत घर, दुकान, गोडाऊनचा मालमत्ता कर मागील कराच्या सुमारे चार पट वाढविण्यात आला आहे. वृक्ष कर ०.५ टक्के, शिक्षण कर ७५ ते १५० रु., २ टक्के रहिवासी व ४ टक्के रहिवासी शिवाय अन्य प्रमाणे ६, ८, १०, १२ टक्के प्रमाणे कर वाढ करण्यात आलेली आहे. रोजगार ही उपकर वरीलप्रमाणे १, १.५, २, २.५, ३ टक्के प्रमाणे करवाढ करण्यात आलेली आहे. सफाई कर ५ टक्के, रस्ता कर ५ टक्के, पाणी लाभ कर २ टक्के प्रमाणे अतिरिक्त करवाढ करण्यात आलेली आहे.महागाई गगनाला भिडलेली असताना करण्यात आलेली करवाढ असह्य असुन सामान्य नागरिकांची तक्रार लक्षात घेता शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात ३० आॅक्टोबरला तीव्र आंदोलनसुद्धा करण्यात आले होते. त्याची दखल घेत चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर मार्फत सतत तीन दिवस सुनावणी करण्यात आली. परंतु त्यात कोणताही निकष काढण्यात आलेला नाही.सामान्य नागरिकांच्या अडचणीची जाण महानगरपालिकेला नसुन सर्वस्तरातुन करण्यात आलेल्या करवाढीचा निषेध होतानासुद्धा झोन क्रमांक तीनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाढीव कराची नोटीस बजावण्यात आली आहे. नागरिकांना विश्वासात न घेता ही करवाढ करण्यात आली असुन मालमत्ता करवाढीचा भडका तळागळातील सामान्यांचा जीव गेल्यावरच कमी होईल का? असा सवाल किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनास केला आहे.जोवर पुर्ववत कर लागू करण्यात येत नाही तोवर नागरिकांनी कराचा भरणा करू नये, असे आवाहनदेखील किशोर जोरगेवार यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे. त्याचप्रमाणे येत्या १० दिवसांच्या आत वाढीव कर पूर्ववत न केल्यास तिव्र आंदोलन करणाचा इशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)
वाढीव मालमत्ता कर पूर्ववत करण्याची मागणी
By admin | Updated: January 3, 2016 01:29 IST