तळोधी बा. : अप्पर तळोधी बा. तालुक्यात दिवसाढवळ्या रेती व दारू तस्करांकडून तस्करी केली जात असताना महसूल व पोलीस विभाग मूग गिळून बसले आहे. रेती तस्करी व अवैध दारू विक्री तत्काळ बंद करा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी ठाणेदारांना दिले आहे.
अप्पर तळोधी बा. तालुक्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नसताना रेती तस्करांनी महसूल व पोलीस विभागाशी जवळीक साधून वाढोणा, चिखलगाव व सावरगाव घाटामधील रेती जेसीबीच्या सहाय्याने उपसा केली जात आहे. दुसरीकडे शासनाने घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले असताना, त्यांना रेतीसाठी इकडे-तिकडे धडपड करावी लागत आहे. तसेच तळोधी, सावरगाव, वाढोणा, गिरगाव, गोंविदपूर याठिकाणी खुलेआम दारूची विक्री केली जात असताना कारवाई केली जात नाही. यामुळे दारू विक्रेते सैराट झाले आहेत. आमचे कुणी काही करू शकत नाही, अशी उर्मट भाषा तस्करांकडून केली जात आहे. तळोधी बा. पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी तळोधी बा. ग्रामपंचायत पदाधिकारी व वलनी ग्रामपंचायतच्या पदाधिकारी यांनी ठाणेदारांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.