निवेदन : महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे साकडेराजुरा : शासनाने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता शासनाने केवळ दारुची दुकाने बंद करून अवैध दारु विक्रीचे परवाने तर दिले नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे. शहरात व ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध दारु विक्रीवर तत्काळ आळा घालण्यासंबंधीचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस राजुराच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असतानाही दारुचा महापूर वाहत आहे. हा दारूचा महापूर कुठून वाहत आहे, याबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका काय आहे, गाव पातळीवर पोलीस पाटलाचे व तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाचे कर्तव्य काय आहे, यासारखे अनेक प्रश्न आज नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. सीमावर्ती भागातील पोलीस चौकी बंद झाल्याने लगतच्या जिल्ह्यातून व राज्यातून पोलीस विभागाच्या मूक सहमतीने शहरात व ग्रामीण भागात सर्रास दारु येत आहे. या अवैध दारुकडे कोणाचेही लक्ष नाही. शहरातील प्रत्येक चौकात, गलोगली व ग्रामीण भागात खुलेआम दारुची विक्री सुरू असल्याने शासनाने दारुबंदी करून महिलाची थट्टा तर नाही केली ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर त्वरित आळा घालण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँगे्रेसच्या यावेळी लता ठाकरे, पुण्या कोडापे, रेणुका सावरकर, भावना ताठे, मंगला सोनेकर, मीना डांगे, छाया करडभुजे, मायाकाशेडीवार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
अवैध दारूविक्रीवर त्वरित आळा घालण्याची मागणी
By admin | Updated: June 23, 2016 00:40 IST