सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ मार्फत खनिज विकास निधीतून तुकूम प्रभाग क्रमांक एकमधील गणेशनगर, सुमित्रनगर, राष्ट्रवादीनगर, निर्माणनगर, अयोध्यानगर आदी परिसरातील ओपन स्पेसमध्ये सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. सर्वत्र ओपन स्पेसमध्ये चैन लिंक फेन्सिंग, ग्रीन जिम, मुलांचे खेळणे, पाथवे आणि बेंचेस लागले आहेत.
केवळ महानगर पालिकेच्या अखत्यारित येत असलेल्या सुमित्रनगरातील एकमात्र राधाकृष्ण मंदिरासमोरील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण अद्यापही झालेले नाही. स्वस्थ राहण्याकरिता नियमित व्यायामाची गरज आहे. ग्रीन जिममुळे नागरिक व्यायामाकडे वळत आहेत; मात्र येथे अशा सोयी-सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही. याबाबत येथील नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तात्काळ या उपेक्षित ओपन स्पेसचे वेळीच सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.