कारमध्ये दारू सापडली : १९ हजारांची विदेशी दारू जप्त घुग्घुस : चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते दीपक जयस्वाल यांना दारूच्या अवैध तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली. ते वणीकडून चंद्रपूरकडे ज्या वाहनातून येत होते, त्यात दारू आढळल्याने पडोली पोलिसांनी ही कारवाई केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास करण्यात आली. पडोली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ठाणेदारांनी पडोली-घुग्घुस रस्त्यावर नाकाबंदी केली. दरम्यान वणीकडून येथे असलेल्या जयस्वाल यांच्या एमएच ३४ एएम २२०० या चारचाकी कारची झडती घेतली असता, डिकीत विदेशी दारूच्या १२ बॉटल्स आढळून आल्या. दारू जप्त करून दीपक जयस्वाल व कार चालक राकेश शंकर चितुरवार या दोघांनाही अटक केली. दोघांवरही ठाणेदार भारत क्षिरसागर यांनी गुन्हा दाखल करून १२ लाखांचे वाहन, मोबाईलसह १९ हजार २०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये दशहत पसरली. (वार्ताहर)
दीपक जयस्वाल यांना अटक
By admin | Updated: February 23, 2017 00:33 IST